बेकायदा खाद्यपदार्थ स्टॉल्समुळे पनवेलमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बेकायदा खाद्यपदार्थ स्टॉल्समुळे पनवेलमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका हद्दीत तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी नागरिकांना स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत सूचना करण्यासह ताप, सर्दी, खोकला टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ बनवून विक्री केली जात आहे. तसेच उघड्यावर मांस विक्री केली जात आहे. तसेच शहरातील बेकायदेशीर खाऊ गललयांतील कचरा फेरीवाले रस्त्यावर, गटारात टाकतात. एकंदरीत या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या बाबत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसत आहे.
नवीन पनवेल शहरात रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. हीच अवस्था पनवेल एसटी स्टॅन्ड परिसरात असून वर्दळीच्या ठिकाणी टपरीधारकांनी महापालिकेचा कुठलाही व्यवसाय परवाना न घेता टपरीमध्ये हॉटेल, सरबतांच्या गाड्या, वडापाव, अंडा बुर्जीच्या गाड्या राजरोसप्रमाणे सुरू केल्या असून फूटपाथवर रात्री भांडी धुऊन कचरा रस्त्यावर आजूबाजूच्या गटारात टाकला जात असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याविषयी जागरूक नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र असे असताना पनवेल महापालिकेची कामगिरी “जैसे थे. आहे. या परिसरात अनधिकृत बांधकामात वाढ होत आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमानी, आजूबाजूच्या सोसायटीच्या रहिवाशी यांना तसेच मॉर्निंग वॉकसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नवीन पनवेल शहरातील से-१७ येथील वर्दळीच्या परीसरात बेकायदेशीर खाऊ गल्लट्यांवर पालिकेने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. पालिका अधिकारी या परिसरात दिवसातून दोन वेळा स्वच्छता टूत हा परिसर स्वच्छ करतात. मात्र येथील बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. याबाबत पनवेल महापालिकेने वेळीच कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
