Breaking News

नवी मुंबई महापालिका नगररचना सहाय्यक संचालक के कान यांची होणार हकालपट्टी!

नवी मुंबई महापालिका नगररचना सहाय्यक संचालक के कान यांची होणार हकालपट्टी!

सभागृहाचा निर्णय... चुकीच्या बांधकाम परवानगी प्रकरणी शासनाच्या सेवेत परत पाठविणार बेलापूर (प्रतिनिधी) – वाशी सेक्टर - ९ येथील नैवद्य सोसायटीला चुकीच्या पध्दतीने बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी काल नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होवून सभागृहाने नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकान यांना नवी मुंबई महापालिकेच्या सेवेतून निष्कासित करत त्यांना पुन्हा राज्य शासनाच्या मुळे सेवेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी सोमनाथ केकान यांच्यावर गंभीर आरोप करीत नवी मुंबईच्या कुठल्याही हिताचा विचार न करणाऱ्या या अधिकाऱ्याने २४ मीटरपेक्षा उंच इमारतींना असणारे नियम डावलून केवळ एकच जीना व एकच लिफ्ट असताना नैवद्य सोसायटीला बांधकाम परवानगी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनीही महापौर सुजाता पाटील यांना दिलेल्या अहवालात आपणास सहाय्यक संचालक नगररचना यांनी दबाव टाकून फायर एनओसी देण्यास भाग पाडल्याचे म्हटले आहे. नैवेद्य या इमारतीला वर्ष २०११ मध्ये नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाने दिलेले फायर एनओसी प्रमाणपत्र चुकीचे असल्याचा खुलासा अग्निशमन अधिकारी पुरूषोत्तम जाधव यांनी नगरसेवक निशांत भगत यांच्या प्रश्नाबाबत सभागृहासमोर माहिती देतांना केला आहे. २०११ रोजीच्या नगररचना विभागाच्या परिपत्रकाचे अनुषंगाने पाहता, यापूर्वी संबंधीत सोसायटीला जे नाहरकत प्रमाणपत्र दिले गेले आहेत ते चुकीचे असून अंतिम जो नाहरकत दाखल दिला आहे तो रद्द करण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल महापौर सुजाता पाटील यांच्याकडे सादर केल्याचे अग्निशमन अधिकारी जाधव यांनी सभागृहात सांगितले... नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे नगरसेवक निशांत भगत यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करतांना नगरसेवक निशांत भगत म्हणाले की, नगरसेवक भरत नखाते यांनी ठराव क्रं. ३१ मांडला आहे व त्यानंतर अग्निशमन अधिकारी जाधव यांनी जो अहवाल महापौरांकडे सादर केला आहे. त्यामधील काही मुद्दे पाहता काही प्रश्न निर्माण झाले आहेत असे सांगत भगत यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे अग्निशामक अधिकाऱ्यांना सभागृहात उत्तर देण्यासाठी उपस्थित राहण्याची सुचना केली. यानंतर नगरसेवक निशांत भगत याविषयी आपले म्हणणे मांडतांना म्हणाले की, सन २०११ मध्ये नैवैद्य को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीला दुसरा सुधारित नाहरकत दाखला देण्यात आला, तो योग्य होता की अयोग्य होता असा सवाल उपस्थित केला. यावर अधिकारी जाधव यांनी उत्तर देतांना सांगितले की, २०११ मध्ये जो सुधरित नाहरकत दाखला देण्यात आला होता. त्याची हाईट ३८.१० मीटर होती. त्या अगोदर नगररचना विभागाने दि. २१ फेब्रुवारी २०११ रोजी एक सर्क्यूलर पारित केले होते व या सर्क्युलरच्या अनुषंगाने या हाईटला जी एनओसी दिली गेली आहे ती योग्य नसल्याचे सांगितले. यावर नगरसेवक निशांत भगत पुढे म्हणाले की, जर २०११ साली नगररचना विभागाकडून सर्क्युलर निघाले होते, तर तो आपल्या विभागाकडे उपलब्ध होते का? असा प्रतिसवाल केला असता, अधिकाऱ्यांनी सर्क्युलर होते असे उत्तरात सांगितले. यावर नगरसेवक निशांत भगत यांनी सभागृहात मुद्दा मांडतांना सांगितले की, जर सर्क्युलर उपलब्ध होता तर नाहरकत दाखला का देण्यात आला तसेच २०११ साली नगररचना विभागाच्या गाईडलाईननुसार ना हरकत दाखला देण्यात आला होता हे खरं आहे का ? असा प्रश्न उपस्थित करताच, अग्निशमन अधिकाऱ्यांनी नगररचना विभागाच्या सर्क्युलर नुसार दाखला देण्यात येत असल्याचे सांगितले. यावर नगरसेवक निशांत भगत अग्निशमन अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, आपण महापौरांकडे सध्यस्थितीत नाहरकत दाखल रद्द करण्यात आला आहे असा उल्लेख असलेला जो अहवाल दिला आहे, तो कोणत्या गाईडलाईननुसार रद्द केला आहे याबाबतची माहिती सभागृहात देण्याची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, नैवैद्य को - ऑपरेटिव्ह सोसायटीला प्रथम २०१० ला नाहरकता दाखला दिला आहे व त्यानंतर दुसरा सुधारित २०११ ला दिला आहे व त्यानंतर तिसऱ्यांदा, चौथ्यांदा व पाचव्यांदा नाहरकत दाखल दिला गेला असल्याचे सांगितले. २०११ रोजीच्या नगररचना विभागाच्या सर्क्युलरच्या याअनुषंगाने पाहता हे जे नाहरकत दिले गेले आहेत ते चुकीचे असून अंतिम जो नाहरकत दाखल दिला आहे तो रद्द करण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल महापौर महोदय यांना सादर केला असल्याचे सांगितले.


Most Popular News of this Week