Breaking News

भविष्यात पनवेल देशाचे ग्रोथ इंजिन असेल - मुख्यमंत्री

भविष्यात पनवेल देशाचे ग्रोथ इंजिन असेल - मुख्यमंत्री

नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू या प्रकल्पामुळे पनवेल जगाशी जोडले आहे. देशातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पनवेल-उरण परिसरात आले आहेत. पनवेलच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असून पनवेल तिसरी महा मुंबई म्हणून विकसित होईल असा विश्वास व्यक्त करतानाच देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन पनवेल असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उलव्यात केले. माजी खा.रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या आणि नावलौकिक असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचा उदघाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत काल उलवे नोड से- १२ येथील रामशेठ ठाकूर मैदानावर भव्य स्वरूपात पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुंबई नंतर तिसरी महामुंबई पनवेलच्या कुशीत तयार होत आहे. पनवेल, खारघर या भागात आगामी कालावधीत भविष्यात कॉर्पोरेट विकासाचे केंद्र विकसित होणार आहे असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २०३० साली भारतातील सर्वात मोठे आणि देशातील १० अग्रगण्य विमानतळांपैकी एक असेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव निमित्ताने रामशेठ ठाकूर यांचा सपत्नीक सत्कार सोहळा तसेच रामशेठ ठाकुर यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘रामपर्व' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर वनमंत्री गणेश नाईक, खा. सुनील तटकरे, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, ना.आशिष शेलार, दिलीप वळसे-पाटील, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आ. मंदा म्हात्रे, आ. महेश बालदी, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, धैर्यशील पाटील, भाजप नेते जे. एम. म्हात्रे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामशेठ ठाकूर यांचा सत्कार हा असामान्य माणसाने सामान्य कसे व्हायचे याचा दिलेला मंत्र आहे. ज्या शाळेत रामशेठ ठाकूर शिकले, त्या रयत शिक्षण संस्थेला त्यांनी भरभरून मदत केली. त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था असताना देखील ते रयत संस्थेच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे एकलव्याप्रमाणे आपली गुरू दक्षिणा, गुरूंनी न मागता देणारे रामशेठ ठाकूर यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात रामशेठ ठाकुर यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. मुंबई बंगळूर पाच तासात प्रवास - केंद्रीय मंत्री गडकरी अटल सेतूमुळे पनवेल, उरण थेट मुंबईला जोडले आहे. आगामी कालावधीत मुंबई ते बंगळूर प्रवासाच्या अनुषंगाने हायवे बांधण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे. या नव्या हायवेमुळे मुंबई ते पुणे दोन तासात तर मुंबई ते बंगळूर पाच तासात जोडले जाईल, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मंत्री गडकरी यांनी माजी खा. रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला. व त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे ना. नितीन गडकरी यांनी कौतुक केले. यावेळी रामशेठ ठाकूर व त्यांच्या अर्धांगिनी शकुंतला ठाकूर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


Most Popular News of this Week