राज्यस्तरीय "अटल करंडक” एकांकिका स्पर्धा....पनवेलमध्ये आजपासून तीन दिवस चालणार महाअंतिम फेरी
राज्यस्तरीय "अटल करंडक” एकांकिका स्पर्धा....पनवेलमध्ये आजपासून तीन दिवस चालणार महाअंतिम फेरी
पनवेल (प्रतिनिधी) - श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय 'अटल करंडक” एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या १२ व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी आज शुक्रवार दि. ०५, 0६ आणि 0७ डिसेंबर रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला 0१ लाख रूपये आणि मानाचा "अटल करंडक” देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते व निर्माता सुनिल बर्वे यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असून राज्यभरातून निवड झालेल्या उत्कृष्ट २५ एकांकिका या तीन दिवसांच्या महाअंतिम फेरीत सादर होणार आहेत. या महाअंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन आज शुक्रवार दि. ५ डिसेंबरला सकाळी ९ वाजता पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाट्य निर्माता कल्पना कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, तेजस कांडपिळे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा रुचिता लोंढे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज यांची उपस्थिती असणार आहे. रविवार दि.७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पारितोषिक वितरण समारंभ माजी खा.रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी गौरव रंगभूमीचा पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी व सुनील बर्वे, तसेच सन्माननीय उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई प्रमुख कार्यवाह अजित भुरे, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर व इतर आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
