पनवेलमध्ये महापालिका उभारणार ४०० खाटांचे हिरकणी रुग्णालय
पनवेल (वार्ताहर) – पनवेल महापालिकेच्या स्व मालकीचे पहिले बहुविशेषज्ञ रुग्णालय ठरणाऱ्या हिरकणी माता बालसंगोपन रुग्णालयाच्या बांधकामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सुमारे १५३ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारे हे ४०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय जून २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, पनवेलकरांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नवीन पनवेलमधील से- १८ येथील (नौपाडा गावासमोर कळंबोली सर्कल ते जेएनपीए महामार्गालगत) प्लॉट क्रं ८-अ आणि ८-ब या भूखंडावर दहा मजली रुग्णालय उभारले जात आहे. ४ डिसेंबर २०२५ रोजी मे. आर. आर. तुळशी बिल्डर्स प्रा. लि. या कंपनीला कार्यादेश देण्यात आला होता. पर्यावरण विभागाची परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने प्रत्यक्ष काम १८ एप्रिलनंतर सुरू झाले. सध्या भूखंडावर खोदकामाचे काम सुरू आहे. सुमारे साडेसात हजार चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयात १०० आयसीयू खाटा, ४५ एनआयसीयू खाटा, एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, मेमोग्राफी, सोनोग्राफी तसेच प्रसूतीसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष अशी आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय १३६ चारचाकी आणि ४५१ दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्राची लोकसंख्या दहा लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज असताना महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याची उणीव या प्रकल्पामुळे भरून निघणार आहे. रुग्णालयाचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रत्येक तीन महिन्यांचा कामाचा आराखडा मागविण्यात आला असल्याची माहिती पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली.
