Breaking News

अखेर पनवेल भाजपामधील शितयुध्द उघड!

अखेर पनवेल भाजपामधील शितयुध्द उघड!

आ.विक्रांत पाटलांविरोधात आ. प्रशांत ठाकूर करणार नेतृत्वाकडे तक्रार

गरज पडल्यास ठोशाला ठोशा द्यायची तयारी...


पनवेल (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील भाजपच्या दोन्ही आमदारांमधील अर्थात ना. गणेश नाईक व आ.मंदा म्हात्रे यांचा राजकीय संघर्ष सर्वज्ञात असतांनाच आता पनवेलमधील भाज़पाचे विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील आणि आमदार प्रशांत ठाकुर यांच्यातील वादही चव्हाट्यावर आला आहे. कालपर्यंत असणारा दोन्ही नेत्यांमधील सुप्त संघर्ष आता उघड होवू लागला असून, आपण आ. विक्रांत पाटील यांच्या संदर्भात लवकरच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार असल्याची भूमिका आ. ठाकुर यांनी घेतली आहे. प्रशांत ठाकुर हे चौथ्यांदा निवडून आलेले पनवेल मतदार संघाचे आमदार असून पनवेल मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे. मात्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस असणारे विक्रांत पाटील हे विधान परिषदेवर आमदार झाल्यापासून पनवेलकरांना दोन आमदार मिळाले. या दोन्ही आमदारांमुळे कार्यकर्तेही दोघांमध्ये विभागले गेले आहेत. भविष्यात पनवेलचे दोन मतदारसंघ होणार असल्याने या नवीन मतदार संघातून उभे राहण्यासाठी आ.विक्रांत पाटील इच्छूक असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर आ.विक्रांत पाटील यांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आपल्या आमदार निधीतून कामांचे वाटप करतांना आ.विक्रांत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतल्याचा आ. प्रशांत ठाकुर यांचा आरोप आहे.

आ.विक्रांत पाटील यांच्याकडून विरोधकांना निधी दिला जातो अशा स्वरूपाच्या पनवेल परिसरात होत असलेल्या चर्चांच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांनी आ. प्रशांत ठाकुर यांच्याकडे नुकतीच विचारणा केली असता, आ. प्रशांत ठाकुर आपली भूमिका स्पष्ट करतांना म्हणाले की, विक्रांत पाटील हे महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आहेत व जेव्हा ते आमदार निवडून आल्यानंतर पनवेल तालुक्यात आणखी एक आमदार मिळाला म्हणून सर्वांना आनंद झाला व त्यांना पुढे २०२९ च्या निवडणूकीत आणखी एक मतदार संघ तयार होईल म्हणून त्यांना लढण्यासाठी तयारी करायची आहे, त्यासाठी त्यांचे विशेष लक्ष या भागावर असल्याने आम्हाला काही अडचण नव्हती. मात्र साधारपणे असे पहावयास मिळाले आहे की, त्यांनी ज्याठिकाणी निधी दिला, त्याठिकाणी निधी देतांना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विश्वासात घेतले जात नाही. याबाबत कार्यकर्त्यांनी मिटींगमध्ये उभे राहून आम्हाला निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. विकास कामाला निधी मिळतो, मात्र याबाबत तालुकाध्यक्ष, बुथ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहित नसते. गावावरून ओवळून टाकलेल्या कुठल्या तरी शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून निधी देण्याचे हे कार्यक्रम झाले आहेत. एकंदरीत या प्रकाराबाबत आम्ही त्यांना यापूर्वीही सांगितले होते. मात्र परत तेच प्रकार सुरु असल्याने आता यासंदर्भात आम्ही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार असून ते निश्‍चितच अँक्शन घेतील असा विश्वासही आ. प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. एकंदरीत निधी वाटपावरून होत असलेल्या या प्रकाराबाबत कार्यकर्ते इतके आक्रमक झाले आहेत की, त्यांचे म्हणणे आहे की, पक्ष म्हणून तुम्ही काहीतरी अँक्शन घ्या. याबाबत मी त्यांना आश्वस्त केले आहे की, विक्रांत पाटील जर अशा प्रकारे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याना सोबत घेवून फक्त आपल्या नावाची पाटी लागण्यासाठी निधी देण्यासाठी येणार असतील तर, भाजप कार्यकर्त्यांसमवेत त्यांना विरोध करण्यासाठी मी सुध्दा उभा राहणार असल्याचा इशारा आ. प्रशांत ठाकुर यांनी आ.विक्रांत पाटील यांना दिला. वास्तविक पाहता, हा विषय प्रसारमाध्यमांसमोर मांडायचा नव्हता. मात्र पत्रकारांनी विचारणा केली व आता निवडणूकीमध्ये लोकांमध्ये जात असतांना संभ्रम नको म्हणून बोलावे लागत आहे असे सांगतानाच भाजप कार्यकर्ता संपूर्णपणे टिम वर्क म्हणून काम करतो. केवळ स्वत:ला उत्सर्जित करण्यासाठी विक्रांत पाटील यांनी असे करणे चुकीचे आहे. अशी जाहीर भूमिका घेतल्यामुळे पक्षाला नुकसान होता कामा नये या अनुंषगाने आम्ही आतापर्यंत शांत राहिलो. मात्र त्यांनाच जर त्याची पर्वा नसेल तर आम्ही काय पर्वा करण्यास मोकाट बसलो नाहीत असे स्पष्ट करतांनाच, आम्हाला सुध्दा उत्तर देता येते आणि ठोश्याला ठोसा द्यायची गरज असेल तर तसेही द्यायची तयारी असल्याचे आ. प्रशांत ठाकुर यांनी नमूद केले.


Most Popular News of this Week