उलवे से-२३ नो लिकर झोन नावापुरते? वहाळगावात बेकायदा दारू विक्री; गुन्हेगारीत वाढ
उलवे से-२३ नो लिकर झोन नावापुरते? वहाळगावात बेकायदा दारू विक्री; गुन्हेगारीत वाढ
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नो लिकर झोन परिसरात दारू विक्रीस कायद्याने बंदी असते. मात्र आजमितीस ही बंदी झुकारून दारू विक्री करण्याचे प्रकार होतांना दिसत आहेत. उलवे से-२३ नो- लिकर झोन असतांनाही वहाळ गावात बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उलवे से-२३ हा परिसर नो लिकर झोन नावापुरते आहे? असा सवाल यानिमित्ताने जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावर उलवे सिटीझन्स नवी मुंबई या ग्रुपवर हा मुद्दा उपस्थित करत, या बेकायदा प्रकाराविरोधात आवाज उठवून संबधित यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. उलवे नोडमधील से-२३ हा शासकीय नियमानुसार नो-लिकर झोन असूनही शेजारील वहाळ गावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीमुळे परिसरात बाहेरील तरुणांची गर्दी वाढत असून तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी मतदान करून वहाळ गावात दारूबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतरही येथे अवैध दारू विक्री सुरू राहिल्याने परिसरात चोरी, भांडणे आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी गावात मोठी चोरी झाली होती. त्यानंतर परवा रात्री प्रतिक षडानन गायकवाड नावाच्या व्यक्तीवर अज्ञात इसमाकडून चाकूने हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. प्रतिक गायकवाड हे मित्रांसोबत सीएनजी भरण्यास जात असताना दारू विक्रीच्या परिसरात मद्या्धुंद अवस्थेत ८ ते १० जण धिंगाणा घालत होते. याबाबत गायकवाड यांनी सदर प्रकाराबाबत जाब विचारताच त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या त्यांच्यावर उलवे येथील रेनर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्व घटनांना गावातील बेकायदेशीर दारू विक्रीच कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून बाहेरून येणाऱ्या मद्यपींमुळे वहाळ परिसरात दहशत निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे उलवे पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करत आहे? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
