नामदेव भगत यांच्यावर शिंदे गटातर्फे राज्यस्तरीय जबाबदारी !
शिवसेना आगरी कोळी समाज राज्य समन्वयकपदी नियुक्ती नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापलिकेचे माजी विरोधी पक्षनेते, सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांची शिवसेना (शिंदे) पक्षाच्या आगरी कोळी समाज राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली असून भगत यांच्या माध्यमातून ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील भुमिपुत्रांना शिवसेना पक्षाच्या झेंड्याखाली संघटीत करण्याचा प्रयत्न नेतृत्वाने केला आहे. नवी मुंबईच्या राजकीय सामाजिक वर्तुळात नामदेव भगत यांनी गेली ३५ वर्षे आपली सक्रियता दाखवत राजकारणाशिवाय शैक्षणिक व सामाजिक कार्यातही योगदान दिले आहे. नवी मुंबईतील आगरी कोळी महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ जोपासतांनाच त्यांनी सिडको संचालक पदावर असताना सिडकोच्या माध्यमातून स्थानिक भुमिपुत्र समाजासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय सिडको बोर्डासमोर मंजूर करुन घेतले. आगरी कोळी समाजासाठी भुमीपूत्र भवन, प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांना भुखंड वाटपाचे धोरण, शैक्षणिक संस्थांसाठी सिडकोतर्फे अनुदान, साडेबारा टक्के भुखंडाचा तत्परतेने निपटारा करण्यात नामदेव भगत यांनी महत्वपूर्ण भुमिका पार पाडली आहे. नवी मुंबईतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी सांभाळली आहे. नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात तसेच आगरी कोळी समाजात आजवर नामदेव भगत यांची सक्रियता व लोकांशी जुळलेली नाळ पाहता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी नामदेव भगत यांच्यावर आगरी कोळी समाज राज्य समन्वयकाची जबाबदारी सोपविली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती पत्र देत भगत यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
