आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेतर्फे जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा खा.नरेश म्हस्केंवर ठाणे नवी मुंबईसह पुण्याची तर उपनेते विजय चौगुलेंवर अहिल्यानगरची जबाबदारी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेतर्फे जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा खा.नरेश म्हस्केंवर ठाणे नवी मुंबईसह पुण्याची तर उपनेते विजय चौगुलेंवर अहिल्यानगरची जबाबदारी
नवी मुंबई (प्रतिनिधी) - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनिमित्ताने जिल्ह्यात सध्या विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी करण्यासह व्युहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला त्यांच्या ताब्यातून घेण्यासाठी मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून शिंदे यांच्या शिवसेनेवर विविध प्रकारे राजकीय आक्रमणे केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे संपर्क प्रमुखांना पक्ष नेतृत्वाने निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुखांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी संपर्क प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर ठाणे, नवी मुंबईसह पुण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनाही या यादीत स्थान देण्यात आले असून त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरेंकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी प्रामुख्याने किरण पावसकर व राजेश मोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अन्य जिल्हा व त्यांचे संपर्क प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत. रत्नागिरी- यशवंत जाधव, रायगड ग्रामीण- संजय घाडी, नवी मुंबई शहर, ठाणे व पुणे संपर्कप्रमुख नरेश म्हस्के, पालघर-रवींद्र फाटक, ठाणे ग्रामीण - प्रकाश पाटील, पिंपरी चिंचवड शहर सिद्धेश कदम, पुणे ग्रामीणसाठी खा.श्रीरंग बारणे आणि राम रेपाळे, साताऱ्यासाठी शरद कणसे, सांगली राजेश क्षीरसागर, कोल्हापूर धैर्यशील माने, संजय मंडलिक तर सोलापूरसाठी संजय कदम, तसेच जळगाव- सुनील चौधरी, नंदुरबार- राजेंद्र गावीत, धुळे- मंजुळा गावीत, अहिल्यानगर - विजय चौगुले, छत्रपती संभाजी नगर- विलास पारकर, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण व जालना-अर्जुन खोतकर, जालना- भास्कर आंबेकर, बीड- टी.पी.मुंडे आणि मनोज शिंदे, धाराशिवसाठी राजन साळवी, नांदेड-सिध्दाराम म्हेत्रे, लातूर- किशोर दराडे, बुलढाणा- हेमंत पाटील, परभणी आंनद जाधव, नागपूर ग्रामीण व शहरसाठी दिपक सावंत, तसेच गडचिरोलीसाठी दिपक सावंत यांच्यासह किरण पांडव यांच्यावर जिल्हासंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भडाऱ्यासाठी गोपीकिशन बाजोरीया, अमरावतीसाठी नरेंद्र भोंडेकर, वर्धासाठी राजेंद्र साप्ते, यवतमाळमध्ये हेमंत गोडसे, अकोला अभिजीत अडसूळ यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा संपर्कप्रमुख पदांच्या या यादीत नवी मुंबईतील राजकारणात सक्रिय राहिलेले शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र नवी मुंबईतील या पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांना या यादीत स्थान न देता, त्यांच्यावर तूर्तास पक्षातर्फे कुठल्याही जिल्ह्याची सोपविण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
