सिडकोचे अतिक्रमणांवर कारवाई सत्र सुरुच... घणसोलीमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा
सिडकोचे अतिक्रमणांवर कारवाई सत्र सुरुच... घणसोलीमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा
- ऐरोली (प्रतिनिधी) – सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सत्र सिडकोतर्फे हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे नुकतीच घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून सिडकोच्या ११०० चौ. मी. भूखंडावरील अतिक्रमण संपूर्णपणे तोडक कारवाई करून अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे. सिडकोच्या या कारवाईत घणसोली नोडमधील से - क्रमांक २५ तसेच मौजे तळवली येथील रघुनाथ बाळकृष्ण पाटील यांच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासन मोहीम राबविण्यात आली. सदर कारवाईसाठी प्रत्येकी १ पोकलेन, सुपरवायझर, फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर तसेच ५ लेबर असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता. या कारवाईत सदरचे अनधिकृत बांधकाम पूर्णतः निष्कासित करण्यात आले. उपरोक्त नमूद अनधिकृत बांधकाम सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून व सिडको महामंडळाकडून कोणत्याही स्वरूपाची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्यामुळे ते निष्कासीत करण्यात आले असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
