नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४ कोटी ४३ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी..
नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४ कोटी ४३ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी..
... नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत सभापती अशोक पाटील यांनी महासभेसमोर सादर केलेला २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहातील १२१ सदस्यांपैकी तब्बल ८६ सदस्यांनी केलेल्या सुचना व सुधारणांसह तब्बल ६९०४ कोटी ४३ लाखांवर पोहचला असून मंगळवारी रात्री उशीरा अर्थात बुधवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली. २७ नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेमध्ये पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी सन २०२५ - २६ चा सुधारित आणि २०२६- चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १०० अन्वये फेरफारासह अंतिम स्विकृतीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवल्यानंतर सर्वानुमते मंजूर झाले. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे उपस्थित होते. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर सभागृह नेते सागर नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह एकूण ८६ सदस्यांनी आपली मते मांडली. त्यानंतर स्थायी समितीने सादर केलेले सन २०२५ - २६ चे सुधारित रु.५८३०.८२ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाज व सन २०२६-२७ चे मूळ रु.६७०४.४३ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाज यावर सर्व सदस्यांनी सूचित केलेल्या सूचनांचा विचार करुन महापौर सुजाता पाटील यांनी, सन २०२५-२६ च्या सुधारित खर्चांत केलेल्या फेरफार व आरंभीच्या शिलकेत रु.२०० कोटी वाढ अपेक्षित धरण्यात आल्याचे सूचित केले. त्यानुसार सन २०२६-२७ चे मूळ जमेचे अंदाज आरंभीच्या शिलकेसह एकूण रु.६९०४.४३ कोटी व खर्चामध्ये रु.२०० कोटींची वाढ करुन एकूण खर्च रु ६८८९.४३ कोटी आणि अखेरची शिल्लक रु. १५ कोटी राहील असा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर केला. याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी कोणतीही करवाढ न करता योग्य नियोजनाव्दारे शहराचा सर्वांगीण विकास घडविण्यावर भर देणारा आणि लोकाभिमुख दर्जेदार सुविधापूर्ती करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडयांचा आर्थिक दस्तऐवज नाही तर नवी मुंबईच्या प्रगतीचा ठाम संकल्प आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, लोककल्याणकारी योजना तसेच गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधापूर्ती करत नागरिकांना दिलासा व प्रशासनाला जबाबदारी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही महापौर महोदयांनी नमूद केले. सर्व सदस्यांनी विचारविनीमय करुन सादर केलेला सन २०२६ - २७ च्या अर्थसंकल्पातील विविध बाबींची प्रभावी अंमलबजावणी करुन नागरिकांना उत्तम दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबध्द असल्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सभागृहात प्रतिपादन केले. विविध विभागांमार्फत सुरु असलेल्या व आगामी काळात करावयाच्या नागरी सुविधांबाबत आयुक्तांनी सभागृहास माहिती दिली. महापालिकेस सेवा सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यादृष्टीने पुढील तीन महिन्यात मालमत्ताकर व पाणीपट्टी थकबाकी भरणा करुन घेण्यावर प्राधान्याने भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिजीटल गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने नागरिकांना विनात्रास सुलभपणे ऑनलाईन सेवा उपलब्ध होत असल्याची व नागरिकांकडून त्याला पसंती मिळत असल्याचेही आयुक्त म्हणाले. यापुढील काळात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यासमवेत प्रभागनिहाय बैठका घेऊन स्थानिक प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
