बेलापूर येथील प्रस्तावीत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव महासभेत रद्द... !
बेलापूर येथील प्रस्तावीत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव महासभेत रद्द... !
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...
सखोल अभ्यासासाठी प्रस्ताव आरोग्य समितीकडे वर्ग
जागा बदलासाठी आ.मंदा म्हात्रेंना करणार विनंती
बेलापूर (वार्ताहर) - बेलापूर से.१५ मधील भूखंड क्र. ४ येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव रद्द करुन खेळाचे मैदान वाचविण्याबाबत काल नवी मुंबई महापालिकेच्या झालेल्या सर्व साधारण सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे गटातर्फे बहिष्कार तर शिवसेना (उबाठा) व मनसेच्या तिघांनी तटस्थता दाखविली. भाजपच्या ६४ सदस्यांनी मतदानाद्वारे हा प्रस्ताव मंजुर केला. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची अन्य उपलब्ध जागेवर उभारणी करुन या हॉस्पिटल विषयी सखोल अभ्यासासाठी हे प्रकरण महापालिकेच्या आरोग्य समितीकडे वर्ग करण्याचे आदेश यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी दिले.
चौदा गावातील भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या जागेमध्ये फेरबदल करण्याचा अथवा हे हॉस्पिटल रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. प्रस्तावित हॉस्पिटल १४ गावातील नेवाळे येथे नवी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्याची सूचना त्यांनी केली व त्यावर महासभेत भाजप सदस्यांनी साधक-बाधक चर्चा केली. या महत्त्वपूर्ण विषयाच्या चर्चेप्रसंगी विरोधकांनी मात्र सभा त्याग केलेला पाहायला मिळाला. या प्रस्तावावर चर्चा करताना भाजप सदस्यांनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला विरोध नसल्याची भूमिका स्पष्ट केली. किल्ले गावठाण येथे उपलब्ध प्रशस्त जागेवर अथवा अन्य पर्यायी जागेवर हे हॉस्पिटल बांधावे अशी सदस्यांनी सूचना केली. तसेच महापालिकेची सध्याची रुग्णालये आधी पूर्ण क्षमतेने सुरु करावीत आणि नंतर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बांधावे असे मत सदस्यांनी मांडले. यावेळी भाजपाचे सदस्य निशांत भगत यांनी सभागृहात सांगितले की, ग्रामस्थ कष्टाने खेळाचे मैदाने तयार करतात आणि सिडको या जागा विकते यावर आक्षेप घेतला. २०१७ च्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये शहरासाठी आवश्यक नागरी सुविधांसाठी आरक्षित जागांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी नवीन रुग्णालयांवर करोडो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा विद्यमान रुग्णालयांची क्षमता वाढविण्याची सूचना केली. भाजपचे नगरसेवक गणेश सकपाळ यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमधून अद्यापही सुविधांची कमतरता असल्याचे नमुद करून अगोदर महापालिकेच्या रुग्णालयांमधील यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली.
भाजप नगरसेविका सलुजा सुतार यांनी गावोगावची खेळाचे मैदानी वाचली पाहिजेत असे स्पष्ट करून विद्यमान पालिकेच्या रुग्णालयांमधून डॉक्टर, नर्सेस आणि अन्य मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली.शिवसेना( उबाठा) पक्षाचे नगरसेवक विशाल ससाने यांनी सीवूड येथे खेळाचे मैदान उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली तसेच महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमधून रात्रीच्या वेळेस ओपीडी सुरू करण्याची सूचना केली. तर भाजप नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी बामन देव झोटिंग देव मैदानात फॉर्मुला फोरचा रेसिंग ट्रॅक उभारण्यास विरोध करून सदरचा हा ट्रॅक अन्यत्र उभारण्याची सूचना केली. भाजपाचे नगरसेवक अशोक पाटील यांनी ऐरोली विभागात नागरिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी यापूर्वी वारंवार मागणी केली आहे. मात्र त्यानंतरही ऐरोली विभागात नागरी आरोग्य केंद्र मंजूर होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली व खेळाची मैदाने वाचवली पाहिजेत अशी भूमिका मांडली. भाजप नगरसेविका भारती पाटील यांनी कोपरखैरणे येथील बांधून तयार असलेल्या नागरी आरोग्य केंद्राचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणी केली. भाजप नगरसेवक सुरज पाटील यांनी सुपर स्पेशलिटी रुग्णालयासंबंधी आ.मंदा म्हात्रे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगून आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वतः बेलापूरचे मैदान खेळासाठीच आरक्षित राहिले पाहिजे, याकरिता यापूर्वी सिडकोला पत्र दिल्याची आठवण करून दिली. सिडकोने नवी मुंबईतील स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्या मात्र मैदाने, शाळा, हॉस्पिटल याकरिता जागा दिल्या नाहीत याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच सभागृहाच्या वतीने आमदार मंदा म्हात्रे यांना विनंती पत्र पाठवून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल खेळाच्या मैदानाऐवजी अन्य जागेवर उभारण्यासाठी विनंती करावी, असे मत सूरज पाटील यांनी मांडले.
उपमहापौर दशरथ भगत यांनी हॉस्पिटल उभारण्यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. हॉस्पिटलसाठी येणारा खर्च, त्यासाठीची तरतुद, आवश्यक मनुष्यबळ, कार्यपद्धती याविषयी अभ्यास करण्याची सूचना त्यांनी केली. या प्रस्तावावरील सविस्तर चर्चेनंतर महापौर सुजाता पाटील यांनी हा प्रस्ताव पुढील सखोल अभ्यासासाठी आरोग्य समितीकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. आरोग्य समितीकडून अहवाल आल्यानंतर हा विषय पुन्हा सर्व साधारण सभेत मंजुरीसाठी घेण्यात येईल तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची जागा बदलण्यासाठी आ.मंदा म्हात्रे यांना सभागृहाच्या वतीने विनंती पत्र देण्यात येईल अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.
