Breaking News

बेलापूर येथील खेळाचे मैदान वाचवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेवर स्थानिकांची धडक

बेलापूर येथील खेळाचे मैदान वाचवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेवर स्थानिकांची धडक

हॉस्पिटलला विरोध नाही, ते पर्यायी जागेवर हलविण्याची मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी) - बेलापूर सेक्टर १५ येथील खेळाचे मैदान वाचवण्यासाठी काल स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडक दिली. यावेळी मुख्यालयासमोर खेळाचे मैदान वाचवायच्या दिलेल्या जोरदार घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला. नवी मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सदरचे जनआंदोलन करण्यात आले. संबंधित खेळाच्या मैदानाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव प्रशासकीय काळात मंजूर झाला होता. मात्र या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून ग्रामस्थ व स्थानिक क्रिडाप्रेमींमध्ये जनप्रक्षोभाचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकांनी व्यक्त केली.

यासंदर्भात नागरिकांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, त्यांचा हॉस्पिटलला विरोध नाही; परंतु ते खेळाच्या मैदानाच्या जागेवर उभारू नये. बेलापूर किंवा नेरूळ परिसरातील उपलब्ध पर्यायी जागांवर रुग्णालय उभारावे आणि मैदानाचा बळी देऊ नये, महापालिकेच्या विकास आराखड्यात मेदानांच्या आरक्षणात बदल केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढल्याचेही आंदोलकांतफे नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे संबंधित मैदान फ्लेमिंगो अधिवासाच्या जवळ येत असल्याने उठन नियमांचा विचार करणे आवश्यक असल्याचा मुद्दाही नागरिकांनी उपस्थित केला. सिमेंटच्या वाढत्या जंगलात मुलांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी खेळाची मैदाने अत्यावश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आलेल्या विषयाच्या अनुषंगाने हॉस्पिटल अन्यत्र वळवून खेळाचे मैदान वाचवण्यासंबंधी समर्थन प्राप्त करण्याकरता यावेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महापौर, उपमहापौर, आयुक्त, गटनेते, विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांना निवेदन सादर केले.


Most Popular News of this Week