Breaking News

नमुंमपा सभागृहनेते पदी सागर नाईक तर विरोधी पक्षनेते पदी विजय चौगुले

नमुंमपा सभागृहनेते पदी सागर नाईक तर विरोधी पक्षनेते पदी विजय चौगुले

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली महासभा काल पार पडली. यावेळी महासभेत महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहनेतेपदी भाजपचे सागर नाईक यांची तर विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे (शिंदे) विजय चौगुले यांची निवड झाल्याचे जाहीर केले. सभागृह नेतेपदासाठी सागर नाईक यांचे नाव सत्ताधारी भाजप पक्षाच्या गटनेत्यांकडून तसेच विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय चौगुले यांचे नाव शिवसेनेच्या गटनेत्यांकडून सुचविण्यात आले होते. अखेरीस दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी सुचविलेल्या या नावांवर काल महासभेत महापौर सुजाता पाटील यांच्याकडून शिक्कामोर्तब करत त्याबाबतची घोषणा करण्यात आली. दरम्यान, आगामी ५ वर्षातील आपले निर्णय पुढच्या ५० वर्षाच्या प्रगतीला दिशा देणारे ठरतील. विरोधी पक्षनेते यांनी फक्त विरोधाला विरोध न करता जनतेच्या प्रश्नावर सभागृहात सहकार्य करावे अशी अपेक्षा निवडीनंतर बोलतांना सभागृह नेते सागर नाईक यांनी विरोधकांना उद्देशून केली. तर सभागृहात हम करे सो कायदा नसावा. सत्ताधाऱ्यांनी सर्वांना सोबत घेवून चालावे अशी सुचना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी निवडीनंतर बोलतांना व्यक्त केली.

महासभेत सभागृहनेते व विरोधी पक्षनेते या महापालिकेतील महत्वाच्या पदांची निवड झाल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांच्यासह माजी महापौर जयवंत सुतार, रविंद्र इथापे, शिवसेना गटनेते मनोज हळदणकर, दिव्या गायकवाड, नेत्रा शिर्क आदींनी दोन्ही पदावर विराजमान झालेल्या उभयंतांना अभिनंदनपर भाषणातून शुभेच्छा प्रदान केल्या. या निवडीबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही सभागृह नेते सागर नाईक व विरोधी पक्षनेते विजय चौगुले ह्या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते व विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झालेल्या दोन्ही मान्यवरांना प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील. जिथे सुधारणा करायला हवी, तिथे प्रशासन सुधारणा करेल. जनतेच्या प्रश्नावर आपण सोबत काम करू...आम्ही प्रशासन म्हणुन आपल्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही यावेळी आयुक्त कैलास शिंदे यांनी उभयंतांना सभागृहात बोलतांना दिली. शिवसेनेच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी सभागृह नेते सागर नाईक यांचे अभिनंदन करताना सभागृहात बोलतांना सांगितले की, आपण पूर्वी त्यांच्या शिक्षिका राहिले आहोत, सागर नाईक हे एक अभ्यासू विद्यार्थी होते असे गौरवोद्गार व्यक्त केले. भाजप नगरसेविका नेत्रा शिर्के यांनीही सभागृह नेते सागर नाईक यांचे अभिनंदन करतांना, सभागृहनेते पदी त्यांच्या झालेल्या निवडीचा व एकूणच त्यांच्याकडे असलेल्या महापालिका अधिनियमाच्या अभ्यासाचा सभागृहाला निश्चित फायदा होईल असा विश्‍वास यावेळी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या अनुभवी कार्याचाही सर्वांना नक्कीच उपयोग होईल असेही त्यांनी नमूद केले.

सभागृहातील मतभेद हे तत्त्वावर असावेत - विरोधी पक्षनेते विजय चौगुले

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सभागृहात आपले मनोगत व्यक्त करतांना विजय चौगुले म्हणाले की, सभागृहातील मतभेद हे तत्त्वावर असावेत. हम करे सो कायदा नसावा. कुठे वाद असेल तर जेष्ठ सदस्यांनी यामध्ये सामंजस्यपणा दाखवून वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा असे सांगतानाच सर्वाना सोबत घेऊन चालावे अशी सूचना चौगुले यांनी सत्ताधारी भाजपला केली.

सभागृहाचे कामकाज नियम व अधिनियमाच्या आधारेच चालेल - सभागृह नेते सागर नाईक

सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर सागर नाईक यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. सभागृहाचे कामकाज अधिनियमाच्या अनुषंगाने चालेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मी मागील ५ वर्षे सभागृहात नसतांना महापालिका अधिनियमाचा काटेकोरपणे अभ्यास केला आहे. त्यामुळे आता मी प्रत्यक्षात सभागृहात असताना जे काही कामकाज चालेल, ते नक्कीच नियम व अधिनियमाच्या आधारेच चालेल अशी ग्वाही सागर नाईक यांनी दिली.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...