वनविभागाच्या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेवक ममित चौगुलेंसह दोघांवर गुन्हा
वनविभागाच्या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेवक ममित चौगुलेंसह दोघांवर गुन्हा
नवी मुंबई (प्रतिनिधी) - रबाळे एमआयडीसी परिसरातील सर्व्हे नं. ९७, यादवनगर-इलठणपाडा भागात राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन व रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र शासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन जेसीबी मशिन घटनास्थळावरून जप्त करण्याची कारवाई केल्यानंतर सदरचे जेसीबी मशिन वनविभागाचे पथक घेवून जात असतांना वनविभागाच्या कारवाईस अटकाव करून जप्त केलेल्या दोन जेसीबींपैँँकी एक जेसीबी नगरसेवक ममीत चौगुले यांनी जबरीने घेऊन जाण्याचा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी वन परिमंडळ अधिकारी संदीप सिताराम मोरे यांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेनेचे प्रभाग क्र.५ ब चे नगरसेवक ममित चौगुले यांच्यासह जेसीबी चालक अनंत धोत्रे अशा दोघांविरोधात बीएनएस २०२३ चे कलम २२१, ३(५), भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नगरसेवक ममीत चौगुले हे शिवसेना उपनेते तथा नगरसेवक विजय चौगुले यांचे सुपूत्र असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात वन परिमंडळ अधिकारी संदीप मोरे यांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रबाळे एमआयडीसी हद्दीत यादवनगर, इलठणपाडा, सर्वे नं. ९७ हा राखीव वन म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला आहे. त्यामुळे येथे कोणतेही बांधकाम किंवा उत्खनन करण्यास कायदेशीर परवानगी नाही. मात्र संबंधित ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोरे यांच्यासह वन विभागाच्या पथकाने दि.१६ फेब्रुवारी रोजी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी उत्खनन केले जात असल्याचे आढळून आले. वन जमिनीमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हे काम सुरू असल्याने वन विभागाने तात्काळ कारवाई करत तेथील दोन जेसीबी मशिन ताब्यात घेतल्या. घटनास्थळी जेसीबी चालक व कामावर असलेले कर्मचारी उपस्थित होते व त्यावेळी जेसीबीवरील चालक हे वन जमीनीमध्ये उत्खनन अनधिकृतरित्या करीत होते. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाहून एमएच-0६ ऐपी ९८२६ व एमएच- ४३ वाय ५१४३ या क्रमांकाचे दोन्ही जेसीबी पंचनामा करून ताब्यात घेतले व सदरचे जेसीबी पूढील कार्यवाहीकरीता वन परिमंडळ अधिकारी मोरे हे वनविभागाच्या घोटेघर, तळोजा रोड येथील कार्यालयात घेवून जातांना रबाळे एमआयडीसी सिंडीकेट कंपनीसमोर आले असता, नगरसेवक ममित चौगुले हे त्याठिकाणी आले व त्यांनी वन अधिकारी मोरे यांना विचारणा केली की, तुम्हाला जेसीबी न्यायचे काय काय अधिकार आहेत ? त्यावेळी मोरे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी जेसीबीमध्ये बसलेले रोजंदारी वनमजूर कृष्णा राजू रोज यास जेसीबीमधून कॉलर पकडून खाली उतरवले व त्याच्याकडील मोबाईल फोन फेकून दिला व त्यानंतर जेसीबी क्र. एमएच ४३ वाय ५१४३ हा त्यावरील चालक अनंत धोत्रे हा जेसीबी घेवून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे कारवाईत जप्त केलेल्या दोन जेसींबीपैकी एक जेसीबी वन परिमंडळ अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या घोटेघर, तळोजा रोड येथील कार्यालयात जमा करून झालेल्या या प्रकाराबाबतची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदविल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक ममित चौगुले यांच्यासह जेसीबी चालक अनंत धोत्रे अशा दोघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
