Breaking News

नेरूळ रेल्वे स्थानकातील प्रवाश्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या!

नेरूळ रेल्वे स्थानकातील प्रवाश्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या!

नेरूळमधील नगरसेवकांचे ना.गणेश नाईक यांना साकडे

नेरूळ (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील नेरूळ या महत्वाच्या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांना विविध समस्यांचा सामना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना समस्या मुक्त करण्यासाठी स्थानकात प्रवाश्यांच्या सोयीसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा मागणीचे साकडे नेरुळमधील नवनियुक्त भाजप नगरसेवकांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे काल वाशीत आयोजित जनता दरबाराप्रसंगी एका निवेदनाव्दारे घातले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार काल वाशीतील विष्णूदास भावे नाटयगृहात पार पडला. यावेळी नेरूळमधील भाजपचे नगरसेवक रविंद्र इथापे, नगरसेवक सूरज पाटील, गिरीश म्हात्रे, नगरसेविका माधुरी सुतार, मीरा पाटील आदींच्या शिष्टमंडळाने वनमंत्री गणेश नाईक यांची जनता दरबारात भेट घेत, नेरुळ रेल्वे स्थानकात प्रवाशी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडत त्यांची सोडवणूक करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनाव्दारे नगरसेवकांनी नेरुळ रेल्वे स्थानकासंदर्भात महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. यात प्रामुख्याने, नेरूळ स्थानकावरून सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत सी.एस.एम.टी./वडाळा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलची नवीन फेरी सुरू करावी, नेरुळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी एक्सलेटर (सरकते जिने) सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागासोबत मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही ना.गणेश नाईक यांनी यावेळी दिली.


Most Popular News of this Week