नवी मुंबईच्या महापौरपदी सुजाता पाटील, उपमहापौरपदी दशरथ भगत बिनविरोध
नवी मुंबईच्या महापौरपदी सुजाता पाटील, उपमहापौरपदी दशरथ भगत बिनविरोध
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी काल झालेल्या निवडणूकीत भाजपच्या सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तसेच दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. शिवसेनेने महापौर व उपमहापौर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र काल शिवसेनेने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा संपादन करून आवश्यक बहूमत प्राप्त केले असल्याने भाजपच्या महापौर व उपमहापौरांची निवड निश्चित मानली जात होती. तर महापालिकेत या पदासाठी संख्याबळ कमी असतांनाही शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदावर दावा करत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. यात महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सरोज पाटील यांनी तसेच उपमहापौरपदासाठी नगरसेवक आकाश मढवी यांचे अर्ज होते. मात्र काल निवडणुक प्रक्रियेच्या दिवशी शिवसेनेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा होवून महापौरपदी सुजाता पाटील व उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली. महापौर व उपमहापौर पदाच्या या निवडीनंतर गेल्या काही वर्षापासून महापालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट अखेरीस संपुष्टात आली असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. निवडणूकीनंतर महापौर व उपमहापौर पदाचे स्थानग्रहण केल्यानंतर प्रथमत: सभागृहाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी माजी खा.संजीव नाईक, माजी आ.संदीप नाईक, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे आणि इतर विभागाप्रमुख तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांचे अभिनंदन केले.
वरिष्ठांनी सोपविलेली नवी मुंबईच्या महापौरपदाची संधी ही मोठी जबाबदारी मानून काम करणार असल्याचे सांगत सभागृहातील वरिष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन व सर्व सदस्यांचे सहकार्य यातून शिस्तप्रिय काम होईल असा विधास महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केला. आपली महापौरपदी निवड ही महिलांच्या समाजातील प्रगतीशील वाटचालीची साक्ष असल्याचे सांगत गृहिणी ते नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीची सभापती नंतर आता महापौरपदाची लाभलेली संधी याबद्दल आनंद व्यक्त करतांनाच नवी मुंबईच्या गतीमान व सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द राहण्याचे व संवेदनशीलपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छता, आरोग्य व महिला सुरक्षेला प्राधान्य देणार -महापौर सुजाता पाटील
महापौर सुजाता पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वच्छता, आरोग्य, शिक्षण,महिला सुरक्षा तसेच पर्यावरण व वाहतूक नियोजन या गोष्टीना प्राधान्यक्रम दिला जाईल अशी ग्वाही दिली. तरुणांना संधी, महिलांची सुरक्षा व सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा आदर व सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असणाऱ्या सुविधा पुरविण्याचा आग्रही व प्रामाणिक प्रयत्न राहील असेही त्यांनी नमूद केले.
गतीमान विकासासाठी उपमहापौरपद एक मोठी संधी -उपमहापौर दशरथ भगत
उपमहापौर दशरथ भगत यांनी देशभरात नावलौकिक असणाऱ्या नवी मुंबईच्या अधिक गतीमान विकासासाठी उपमहापौरपद ही एक मोठी संधी असून त्यासाठी अथक व प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. आगामी काळात नवी मुंबईकर नागरिकांना अपेक्षित असे चांगले काम सर्वांना सोबत घेऊन केले जाईल असा निर्धार व्यक्त करीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी सर्व सहयोगी सदस्यांचे आभार मानले.
