नवी मुंबईत पानटपर््यांसह जनरल स्टोअर्समध्ये नशीली पदार्थांची विक्री ?
नवी मुंबईत पानटपर््यांसह जनरल स्टोअर्समध्ये नशीली पदार्थांची विक्री ?
अंमली पदार्थ व तंबाखूविक्री विरोधात तात्काळ कारवाईची पोलिसांकडे मागणी
बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबईत गुटखा, तंबाखू तसेच अंमली पदार्थ विक्री करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरिकांचे विशेषकरून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग व्यसनाच्या आहारी जातांना दिसत आहे. या बेकायदा प्रकारांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी अधिवेशनात ठरल्याप्रमाणे पोलिसांकडून तात्काळ व कायमस्वरूपी कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्रिमूर्ती व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे मार्गदर्शक तथा समाजसेवक दिलीप आमले यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त मयुर भुजबळ यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.
यासंदर्भात दिलीप आमले यांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या या पत्रातून आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले आहे की, नवी मुंबई परिसरात गुटखा, तंबाखू तसेच अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. विशेषतः शाळा, कॉलेज, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पवित्र देवस्थान, महिला व मुली यांच्या ये- जा करण्याच्या ठिकाणी असलेल्या पानटपऱया, जनरल स्टोअर्स, किराणा दुकाने तसेच बिअर बारमधून खुलेआम अशा पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकंदरीत होणाऱ्या या बेकायदा प्रकारामुळे लहान मुले, युवक , विद्यार्थी, नागरिक आदींचे आरोग्य व भविष्य धोक्यात येत असून समाजात व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे अधिवेशनात ठरल्याप्रमाणे असे प्रकार थोपविण्यासाठी तात्काळ व कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसह या प्रकारावर अंकूश आणण्यासाठी करावयाच्या कारवाईसाठी नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विशेष पथकांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
