मराठी सिनेअभिनेते स्वप्निल जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप
मराठी सिनेअभिनेते स्वप्निल जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप
नवी मुंबई (प्रतिनिधी) - रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांचे पालन करण्यापुरती मर्यादित नाही; ती आपल्या सर्वांची सामायिक चिंता आणि सामूहिक जबाबदारी आहे. या दृष्टिकोनाला अनुसरून, रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत विविध जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आले होते. काल या ३७ व्या रस्ता सुरक्षा अभियान- २०२६ (सडक सुरक्षा जीवन रक्षा) समारोप मराठी सिने अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलींद भारंबे यांच्यासह सह पोलिस आयुक्त संजय ऐनापुरे व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना सडक सुरक्षा जीवन रक्षा अशी होती. रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर यानिमित्ताने भर देण्यात आला. राज्यभर राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढण्यासह अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच इतर संबंधित संस्था व संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. केंट्रोय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (एमओरटीएच) यांच्या मार्गदर्शनानुसार या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, वाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्रे, नेत्र तपासणी शिबिर तसेच विविध प्रचारात्मक उपक्रम आयोजित करण्यावर सर्वत्र भर देण्यात आला.
