स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ करिता नवी मुंबई महापालिका सज्ञ!
देशातील सर्वात स्वच्छ शहराच्या मानांकनासाठी आयुक्तांची आढावा बैठक
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई शहर मागील वर्षीपासून देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग" या विशेष कॅटेगरीमध्ये मानांकित असून यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये संपूर्ण क्षमतेने सहभागी होत आहे. याकरिता स्वच्छ भारत मिशन मार्फत जाहीर झालेल्या टुलकीट नुसार सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहयोगाने सुपर स्वच्छ लीग मधील आपले मानांकन कायम राखण्यासाठी महापालिका सजन असून त्यानुसार स्वच्छताविषयक प्रत्येक बाबीत करावयाच्या अपेक्षित कार्यवाहीचा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सविस्तर आढावा विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.राहुल गेठे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. कृती आराखड्यात नमूद बाबींच्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केवळ गुणांकनाकरिता नाही तर केलेल्या कामाचे आपल्याला संपूर्ण समाधान मिळेल अशाप्रकारे नियमीत स्वच्छता कामे हाती घ्यावीत व स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक यांच्यापासून ते उच्च अधिका-यांपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करुन द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. याविषयी माहितीपुस्तिका तयार करुन ती प्रत्येक घटकाला उपलब्ध करुन द्यावी असेही त्यांनी सूचित केले. या वर्षीपासून स्वच्छ भारत मिशनच्या वतीने “स्वच्छ शहर जोडी” उपक्रमांतर्गत देशातील १९६ शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण ७२ मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये “सुपर स्वच्छ लीर्ग' मध्ये समाविष्ट नवी मुंबई महापालिका शहरास महाराष्ट्र राज्यातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर, कन्नड - या ५ नगरपरिषदा स्वच्छ शहर जोडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. या स्वच्छ शहर जोडी असलेल्या ५ शहरांकरिता नवी मुंबई महापालिकेचे ५ नोडल अधिकारी नेमण्यात यावेत आणि त्यांनी आगामी २ महिन्यात या शहरांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना स्वच्छतेतील प्रगतीबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या. महामार्गाच्या स्वच्छतेकडे अधिक काटेकोरपणे नियमित लक्ष द्यावे व याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमांची व्याप्ती वाढवावी असे निर्देश देतानाच रेल्वे स्टेशन व परिसर सिडकोच्या अखत्यारित येत असल्याने येथील स्वच्छतेबाबत सिडकोकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा आणि स्वच्छता करून घ्यावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
मार्केटमधील स्वच्छतेबाबत तेथील विक्रेत्यांनी खबरदारी घेण्याविषयी त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सतत मोहीमा राबवाव्यात व त्यामध्ये सातत्य राखावे अशा सूचना दिल्या तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायादेखील अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश त्यांनी दिले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे शहराचे जबाबदार नागरिक असल्याने रस्त्यावर कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, ओला - सुका कचरा वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणी म्हणजे घरातूनच करावे, प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिक वापरण्याचे पूर्णपणे बंद करावे, हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत, थ्री आर" म्हणजे कचरा कमी करणे व कचऱ्याचा पुनर्वापर करणे आणि कचऱ्यापासून पुनर्निर्मिती करणे ही त्रिसूत्री उपयोगात आणावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. शाळांमध्ये सॅनेटरी पॅड वेंडींग मशीन लावण्यात आलेल्या आहेत. त्या कार्यान्वित असतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे. महाविद्यालयीन युवकांनाही स्वच्छता उपक्रमात मोठया प्रमाणात सहभागी करुन घ्यावे असे सूचित करतानाच यांना केलेल्या कामाचे प्रशस्तिपत्र द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
रस्ते, रस्त्यांच्या बाजूच्या जागा, उड्डाणपूल, उड्डाणपूलाखालील जागा, दुभाजक, बॅकलेन, मैदाने या ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी राबविण्यात येत असलेल्या मोहीमांमध्ये सातत्य राखावे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांचे अभिप्राय, सूचना व तक्रारी यांची दखल घेऊन त्याची तत्परतेने अंमलबजावणी करावी व सिटीझन फिडबॅक” विषयी व्यापक कार्यवाही करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
डेब्रीज तपासणीसाठी दुचाकी उपलब्ध करून देण्याचे निर्देश
बांधकाम व पाडकाम कचरा महापालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी जाईल, याबाबत अधिक जनजागृती करावी व डेब्रीज भरारी पथके सक्षम करण्यासाठी डेब्रीजवर निरीक्षण व तपासणी करण्याची कार्यवाही राबविण्याकरिता मोटर सायकल उपलब्ध करून द्याव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.
