Breaking News

नवी मुंबई महानगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर... मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या तीन व्यावसायिक मालमत्ता जप्त

नवी मुंबई महानगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर... मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या तीन व्यावसायिक मालमत्ता जप्त

 नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.  त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी नेरुळ येथील तीन व्यावसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार आणि उपायुक्त डॉ.अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागातील जप्ती पथकाकडून ही मालमत्ता जप्ती कारवाई करण्यात आली आहे.

वारंवार आवाहन करूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत, अशा थकबाकीदार मालमत्ताधारकांना कोणतीही सूट न देता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात असून त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून जप्ती पथक स्थापन करण्यात आले आहे. शहरातील सर्व विभागीय कार्यालयांमार्फत ही मोहीम राबविण्यात येत असून थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्तांना कर संकलन विभागीय कार्यालयांच्या जप्ती पथकांनी भेटी देण्यास सुरुवात केली असून थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्तांवर थेट सील व जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकासासाठी मालमत्ता कर हा अत्यंत महत्त्वाचा महसूल स्रोत आहे. या कराच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सेवा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा व शिक्षण व्यवस्था सक्षमपणे राबवली जाते. वारंवार सूचना, नोटिसा देऊनही काही थकबाकीदारांकडून कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आता कठोर भूमिका स्वीकारली असून कोणतीही सूट किंवा तडजोड न करता थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

मालमत्ता कर थकबाकीदारांची अचूक माहिती, क्षेत्रनिहाय नियोजन आणि वेळापत्रकबद्ध कारवाई या तीन बाबींवर भर देऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत रोजच्या आढाव्यानुसार प्रगती तपासली जात असून थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा केल्यास जप्ती कारवाई टाळता येऊ शकेल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. 


Most Popular News of this Week