Breaking News

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती

मतदान करणेविषयी प्रचार करतांना उमेदवार व प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे करावे पालन

 नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 यावर्षी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने होत असून प्रभाग क्रमांक 1 ते 27 मधील मतदारांनी अ,ब,क,ड अशा 4 जागांसाठी स्वतंत्र मतदान करावयाचे आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 28 मधील मतदारांनी अ,ब,क अशा 3 जागांसाठी मतदान करावयाचे आहे. या मतदान पध्दतीविषयी नागरिकांना योग्य माहिती मिळावी याकरिता महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांचा वापर करुन व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत आहे.

            • बहुसदस्यीय पॅनल पध्दतीमध्ये कसे मतदान करावे याविषयी माहिती पत्रके वितरीत करण्यात आली आहेत.

            • शहरामध्ये वर्दळीच्या 300 हून अधिक ठिकाणी मतदान पध्दतीविषयी माहिती देणारे होर्डिंग व डिजीटल बॅनर्स उभारण्यात आले आहेत. एनएमएमटी बसेस व बसस्टॉप वरही मतदान पध्दतीचे बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.

            • वर्तमानपत्रात जाहिरात व प्रसिध्दीपत्रके प्रसिध्द करण्यात आली आहेत.

            • महानगरपालिकेच्या फेसबूक, इंस्टाग्राम, एक्स व यू ट्यूब अकाऊंटवरुन मतदान पध्दतीची सोप्या भाषेत माहिती देणारी व्हिडिओ चित्रफित मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसारित करण्यात आली आहे.

            • व्हॉट्सॲपवरुनही हे व्हिडिओ मोठया प्रमाणात नागरिकांमध्ये प्रसारित करण्यात आले आहेत.

            • याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम राहू नये याकरिता बीएलओ व समुह संघटकांव्दारे ठिकठिकाणी समुह भेटी घेउुन मतदान पध्दतीची माहिती दिली जात आहे.

 

*मतदानाबाबत अपप्रचाराला बळी पडू नये व महापालिकेच्या अधिकृत समाजमाध्यमांवरुन घ्यावी माहिती*

            *मतदान पध्दतीची माहिती देताना काही घटकांकडून अ,ब,क,ड अशा चारही जागांवर एकाच पक्षाच्या उमेदवाराला मत दिले नाही तर मतदान ग्राह्य धरले जाणार नाही असा अपप्रचार केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. वास्तविकत: नागरिक अ,ब,क,ड या चारही जागांवर त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही उमेदवारास मत देउु शकतात याची सर्वांनीच नोंद घ्यावी आणि मतदानविषयीच्या अफवा व अपप्रचाराला  बळी पडू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी पॅनल पध्दतीतील मतदानाबाबत योग्य आणि अधिकृत माहिती घेण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत समाजमाध्यमांचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.*

 

*इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींचे प्रसिध्दीपूर्वी प्रमाणन करून घेणे आवश्यक*

          निवडणूकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षास अथवा उमेदवारास दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्युब वाहिन्या, सिनेमागृह, सार्वजनिक ठिकाणचे ऑडिओ – व्हिज्युअल डिस्प्ले, व्हॉईस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे अशा कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे जाहीरात प्रसारित / प्रसिध्द  करावयाची असल्यास त्या प्रस्तावित जाहिरातींच्या मसुद्यास माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून प्रसिध्दीपूर्वी पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. पूर्वप्रमाणन केले नसल्यास त्या जाहिरातीचे प्रसारण / प्रसिध्दी करता येणार नाही, याची नोंद घ्यावयाची आहे. याचे उल्लंघन होणार नाही याची सर्व संबंधित राजकीय पक्ष व उमेदवारांनी दखल घ्यावयाची आहे.

 

*मतदान करणेविषयी प्रचार करतांना उमेदवार व प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे करावे पालन*

            सद्यस्थितीत निवडणूक लढविणा-या उमेदवारांमार्फतही बहुसदस्यीय पॅनल पध्दतीत कसे मतदान करावे याबाबत मतदान यंत्राची प्रतिकृती दाखवून प्रचार केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रचार हा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसिध्द वा प्रसारित करण्यापूर्वी त्याचे माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे.

            तसेच प्रचाराबाबत मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आचारसंहितेबाबत मार्गदर्शक सूचना, अ.क्र 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे - उमेदवारांनी नकली (डमी) मतपत्रिका आपल्या मतदारांना माहिती देण्यासाठी छापण्यास हरकत नाही. तथापि, सदर मतपत्रिकेवर त्यांनी स्वत:चे नाव, अ.क्र. आणि चिन्ह, इतकीच माहिती छापावी. अन्य कोणत्याही उमेदवाराचे नाव, अ.क्र. आणि चिन्ह, नकली मतपत्रिकेवर छापण्यात येऊ नये. दुस-या उमेदवाराचे नाव छापलेली मतपत्रिका आढळून आल्यास त्या जप्त करुन संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या रंगाची मतपत्रिका संबंधित मतदान केंद्रावर वापरण्यात येणार आहे त्याऐवजी दुसऱ्या रंगाची नकली मतपत्रिका छापण्यात यावी. तसेच सदर मतपत्रिका मतदान केंद्रावर वापरण्यात येणाऱ्या मतपत्रिकेपेक्षा वेगळ्या आकाराची असावी जेणेकरुन त्यामधील फरक त्वरित लक्षात येईल.

            तसेच अ.क्र. 9 मध्ये नमूद केल्याप्रमाणे  - उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी नकली (डमी) बॅलेट युनिट तयार करुन घेण्यास हरकत नाही. त्याद्वारे मतदारांना त्याची माहिती देणे सुलभ होईल. मात्र, अशी नकली बॅलेट युनिट लाकडी, प्लास्टिक अथवा प्लायवूडची असावीत व ती अधिकृत बॅलेट युनिटच्या अर्ध्या आकाराची असावीत व त्यास अधिकृत बॅलेट युनिटला असलेला रंग वगळून अन्य रंगामध्ये ती तयार करण्यात यावी.  

        *वरील अ.क्र. 8 व 9 मधील राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेबाबतच्या नियमांचे पालन होईल याची उमेदवारांनी व सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्रचार करतांना काटेकोर दक्षता घ्यावी. या नियमांचे उल्लंघन करुन कोणी नकली मतपत्रिकेव्दारे प्रचार करीत असेल तर तो तात्काळ थांबवावा अन्यथा संबधितांविरुध्द नियमानुसार आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात येईल असे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.*


Most Popular News of this Week