मतदान जनजागृतीत नवी मुंबईकर तृतीयपंथी नागरिकांचाही पुढाकार
मतदान हा संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला समान हक्क असून आम्ही मतदान करणार आहोत, तुम्हीही मतदान करा असा संदेश नवी मुंबईतील तृतीयपंथी नागरिकांनी मार्केट, चौक व वर्दळीची ठिकाणे येथे प्रसारित केला. 15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत 100 टक्के मतदान व्हावे याकरिता स्वीप उपक्रमांतर्गत व्यापक जनजागृती करण्यात येत असून यामध्ये सर्व समाजघटकांचा उत्साही सहभाग लाभत आहे.
विशेषत्वाने शाळा – महाविद्यालयांमध्ये मतदान जागरुकता अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहे. त्याचप्रमाणे महिला मंडळे, विविध स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्यामार्फतही यावर्षी पहिल्यांदाच होणा-या बहुसदस्यीय मतदान प्रक्रियेत कसे मतदान करावयाचे याविषयी माहिती प्रसारित केली जात आहे. यामध्ये आता तृतीयपंथी नागरिकांनीही पुढाकार घेत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अरेंजा कॉर्नर, से.9 मार्केट याठिकाणी मतदान जनजागृतीत प्रत्यक्ष सहभाग घेतला असून मतदानाविषयीची माहितीपत्रके वितरित करुन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तृतीयपंथीय नागरिकांनीही मतदान जनजागृती मोहीमेत सहभाग घेतल्याने याव्दारे नवी मुंबईच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे दर्शन घडत आहे.
