Breaking News

पनवेल महापालिकेत महिलांचा सहभाग वाढणार

पनवेल महापालिकेत महिलांचा सहभाग वाढणार

पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिकेच्या निवडणूक रिंगणात एकूण २५५ उमेदवार हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यापैकी १०४ महिला उमेदवार असल्याने येणाऱ्या नव्या बॉडीमध्ये महिलांचा या सहभाग मोठा असणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या १९ जणींना पुन्हा संधी दिली असून यातील बहुतांशी या भाजपच्या उमेदवार आहेत. भाजपने माजी महापौर डॉ. कविता चौतमोल यांना पुन्हा प्रभाग १६ मधून संधी दिली आहे. तर प्रभाग २० मधून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्ष आणि प्रथम उपमहापौर चारुशीला घरत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या निवडणुकीत संधी मिळाली नाही. गत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात १९ माजी नगरसेविकांना पनवेलमध्ये संधी देण्यात आली. अनेक नगरसेविका शेकापमधून निवडून आल्या होत्या. कालांतराने पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपमध्ये आल्याने त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक भाजपमध्ये आले. या नगरसेविकांना भाजपने संधी दिली आहे. यामध्ये डॉ. सुरेखा मोहोकर यांचा समावेश नसला तरी त्यांना योग्य पुनर्वसनाचे आधासन दिले आहे. याआधीही महिला लोकप्रतिनिधींनी अनेक समस्यांवर आवाज उठवल्याचे पाहावयास मिळले आहे. तर बिनविरोध सदस्यांमध्ये पनवेल पालिकेत ७ बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. यामध्ये ममता प्रीतम म्हात्रे, स्नेहल स्वप्नील ढमाले, रुचिता गुरुनाथ लोंढे आणि दर्शना भगवान भोईर अशा चार महिला उमेदवारांचा समावेश आहे.


Most Popular News of this Week