Breaking News

भाजपाचे उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्यास परवानगी : हायकोर्टाचा निर्णय

भाजपाचे उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्यास परवानगी : हायकोर्टाचा निर्णय

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय केला रद्द

उमेदवारी अर्ज रद्द करणे हे राजकीय कारस्थान 

 नवी मुंबई (प्रतिनिधी ) - नवी मुंबई महापालिका निवडणूक 2026 मधील प्रभाग क्रमांक 17 अ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. यासंबंधीचा महत्त्वपूर्ण  निकाल आज कोर्टाने दिला.  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर निलेश भोजने यांचा अर्ज पडताळणी दरम्यान रद्द केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या निर्णयाविरोधात श्री भोजने यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यांच्या याचिकेवरील  पहिली सुनावणी 8 जानेवारी 2026 रोजी पार पडली. या सुनावणी मध्ये प्रथमदर्शनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. अर्ज पडताळणी दरम्यान शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटकर यांनी निलेश  भोजने यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता.

 महानगरपालिका कायदा 1949   कलम 10 (1 ड )अंतर्गत अनधिकृत बांधकाम मुद्द्यावरून भोजने यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. मात्र संबंधित बांधकाम हे श्री. भोजने यांना त्यांच्या वडिलांकडून बक्षीस पात्र मिळाले होते. शिवाय महानगरपालिका  कायद्याचे   10 (1 ड ) हे कलम   निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरलेल्या उमेदवाराला लागू पडत नाही तर विद्यमान लोकप्रतिनिधीला लागू पडते असा युक्तिवाद भोजने यांच्या वतीने वकिलांनी केला. याप्रकरणी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे म्हणणे देखील ऐकून घेतले. आज झालेल्या अंतिम सुनावणी मध्ये निलेश भोजने यांचा अर्ज बाद करण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश भोजने यांनी याविषयी माध्यमांना माहिती दिली. यावेळेस ज्येष्ठ माजी नगरसेवक विठ्ठल मोरे,  प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार सुरेश शिंदे आणि शीतल भोईर उपस्थित होते. माझा उमेदवारी अर्ज कोणाच्या दबावाखाली बाद करण्यात आला? असा प्रश्न निलेश भोजने यांनी उपस्थित केला.  त्याचबरोबर अर्ज मागे घेण्यासाठी आपल्याला प्रलोभने दाखवून दबाव निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बेकायदा निर्णयाविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाग 17 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा भेटत असून त्यामुळेच विरोधकांनी राजकीय कारस्थान करून आपला अर्ज बाद करायला लावला असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर विठ्ठल मोरे यांनी निलेश भोजने यांच्यावर घेतलेला आक्षेप म्हणजे प्रभागातील सर्वसामान्य जनतेने गरजेपोटी केलेल्या बांधकामावर घेतलेला आक्षेप आहे असे नमूद करून हा विषय आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ, असे स्पष्ट केले.


Most Popular News of this Week