Breaking News

तळवली येथील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

तळवली येथील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सिडकोतर्फे तीव्र करण्यात आली असून काल घणसोली नोडमधील तळवली येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) विभाग यांच्या पथकाकडून सदरची ही कारवाई करण्यात आली. घणसोली नोडमधील से-२१ मौजे तळवली सर्व्हे नं-१८३ याठिकाणी सिडकोची परवानगी न घेता, आरसीसी तळमजल्याचे चालु बांधकाम (अंदाजे क्षेत्र-३००,००) करण्यात येत असल्याची सिडको अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आले होते. यासंदर्भात अनधिकृत बांधकामधारक/भोगवटाधारक मोरेश्वर म्हात्रे, पंढरीनाथ म्हात्रे व कर्णेश पाटील यांना यांना सिडकोतर्फे महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन अधिनियम १९६६ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सदरठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने अखेरीस सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया अवलंबून घणसोली नोडमधील से-२१ मौजे तळवली सर्व्हे नं-१८३ याठिकाणी सिडकोची परवानगी न घेता, उभारण्यात येत असलेल्या आरसीसी तळमजल्याचे चालु बांधकामावर (अंदाजे क्षेत्र-300,००) कारवाई केली. या कारवाईप्रसंगी कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी सिडको सुरक्षारक्षक मंडळासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



Most Popular News of this Week