घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागातर्फे शहरातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईची मोहिम तीव्र केली असून कालआहे. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) विभाग यांच्या पथकाने नुकतीच घणसोली नोड से-२० मौजे तळवली सर्व्हे नं- १२२, १२३ व १२४ येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या कारवाईत विकासक रहीम मुजावर यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामामधील १६ स्लॅब्स आणि ३ जीने तोडण्यात आल्याची माहिती सिडकोने दिली. घणसोली नोडमधील या कारवाईत कोपरखैरणे से-२० मौजे तळवली सर्व्हे नं- १२२, १२३ व १२४ येथे विनापरवानगी अंदाजे २७० चौ.मी.मापाचे जी प्लस १ आरसीसी स्वरूपाचे चालु बेकायदा बांधकाम हटविण्यात आले. यासंदर्भात अनधिकृत बांधकामधारक रहिम मुजावर यांना सिडकोतर्फे महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन अधिनियम १९६६ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सदरठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने अखेरीस सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून सदरच्या या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. या कारवाईप्रसंगी कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी सिडको सुरक्षारक्षक मंडळासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
