Breaking News

नवी मुंबई मनपाच्या १११ जागांसाठी ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात!

नवी मुंबई मनपाच्या १११ जागांसाठी ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात!

शेवटच्या दिवशी २६९ उमेदवारांनी घेतली माघार

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी विविध प्रभागांमधून एकूण २६९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. नवी मुंबई महापालिकेच्या २८ प्रभागांमधून १११ जागांसाठी संपूर्ण नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात काल अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी २६९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या १११ जागांसाठी रिंगणात ४९९ अंतिम उमेदवार राहिले असल्याचे स्पष्ट होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया बुधवारी 3१ डिसेंबर रोजी पूर्ण झाली. त्यातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण मनपा क्षेत्रात दाखल झालेल्या ९५६ नामनिर्देशन अर्जांपैकी ८३९ अर्ज वैध तर ११७ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरविण्यात आले आहेत. दरम्यान काल २६९ अर्ज मागे घेण्यात आल्याने निवडणूकीच्या रिंगणात आता ४९९ अंतिम उमेदवार राहिले असल्याने त्यांच्यामध्ये निवडणूकीचा सामना रंगणार आहे.

दरम्यान, उमेदवारी नामनिर्देशनपत्र माघारी घेतलेल्या उमेदवारांच्या विभागनिहाय संख्या तपशील व निवडणूकीच्या रिंगणात राहिलेल्या उमेदवारांचे संख्या पुढीलप्रमाणे- बेलापूर - ४६ अर्ज मागे घेतले तर ७४ अंतिम उमेदवार रिंगणात, नेरूळ - ५५ अर्ज मागे तर ७९ अंतिम उमेदवार रिंगणात, वाशी - २५ अर्ज मागे तर ४६ अंतिम उमेदवार रिंगणात, तुर्भे - 3३ अर्ज मागे तर ८४ अंतिम उमेदवार, कोपरखैरणे - २९ अर्ज मागे तर ६२ अंतिम उमेदवार रिंगणात, घणसोली - ३० अर्ज मागे तर ४४ अंतिम उमेदवार रिंगणात, ऐरोली - २९ अर्ज मागे तर ५२ अंतिम उमेदवार रिंगणात व दिघा विभागात २२ अर्ज मागे घेतल्याने निवडणूकीत ५८ अंतिम उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या रिंगणात आता ४९९ अंतिम उमेदवार शिल्लक राहिले आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणूक २८ प्रभागांसाठी १११ सदस्य संख्येकरिता होत आहेत. यात २७ प्रभाग हे ४ सदस्यीय असून एक प्रभाग ३ सदस्यीय आहे. एकुण ९,४८,४६० इतकी एकूण मतदार संख्या असून त्यामध्ये ५,१६,२६७ पुरुष व ४,३२,०४० इतके स्त्री मतदार आणि १५३ इतर मतदार आहेत.

पॅनेल पध्दतीमुळे सर्व पक्षांची कसोटी

दरम्यान, नवी मुंबई मनपाची यंदाची ही निवडणूक २७ प्रभाग हे ४ सदस्यीय व एक प्रभाग ३ सदस्यीय अशा पॅनेल पध्दतीने असल्याने एका मतदारास चार सदस्यांना मतदान करावयाचे आहे. अशा स्वरूपाची ही पहिलीच निवडणूक शहरात होत असल्याने या निवडणूकीत सर्व पक्षांचा कस लागणार असल्याचे बोलले जात असून निवडणूकीत नेमका कोणता पक्ष व कोणते उमेदवार बाजी मारतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Most Popular News of this Week