सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनु सैद मैदानातील अवैध पार्किंगवर कारवाई
सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनु सैद मैदानातील अवैध पार्किंगवर कारवाई
बेलापूर (वार्ताहर) - बेकायदा वाहन पार्किंग व इतर विविध कारणांमुळे नवी मुंबई महापालिकेच्या सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली होती. मात्र त्यानंतरही संबंधित विभागाकडून येथील अवैध पार्किंगवर कारवाई करण्याबाबत चालढकलपणा होताना दिसत होता. दरम्यान, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे काल तुर्भे येथील निवडणूक कार्यालयाचा पाहणी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी ते दौरा आटोपून पामबीच मार्गे पुढे जात असताना, हुतात्मा बाबू गेनू मैदानाची झालेली दुरावस्थेची बाब त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी बोलावून त्यांना कारवाई करण्याचे फर्मान दिल्याने अखेरीस या मैदानातील अवैध पार्किंगवर धडक कारवाई करण्यात आल्याने हे मैदान आता मोकळा श्वास घेवू लागलयाने स्थानिक खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे. सानपाडा परिसरात चांगल्या प्रकारे खेळाची मैदाने तसेच उद्याने उपलब्ध आहेत. परंतु हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या सोसायटीमधील रहिवाश्यांकडून सदर मैदानावरील जागेवर कब्जा करत बेशिस्तपणे आपली वाहने पार्क करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. विशेष म्हणजे ही वाहने दिवसभर आणि रात्रीही येथे उभी राहत असल्याने ह्या गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुलांना या मैदानात खेळण्यास मनाई केली जात होती. यामुळे लहानग्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे; याच मैदानामध्ये एक अतिक्रमित पोलीस ठाणे होते. सानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील दाखल गुन्हयातील जप्त बेवारस वाहनेही पाठीमागील बाजूस धुळखात पडून होती. एकंदरीत या सर्व प्रकारांमुळे येथील परिसराला बकालपणा आला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी काल तुर्भे येथील निवडणूक कार्यालयाचा दौरा केला. यानंतर ते पामबीच मार्गे पुढे जात असताना त्यांना हुतात्मा बाबू गेनू मैदानाची दुरावस्था निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अनिल भोईर यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या साहाय्याने या ठिकाणच्या गाड्यांवर कारवाई करण्यासह काही गाड्या जप्त करून डंपिंग ग्राउंडवर नेण्यात आल्या. मैदानाची साफसफाई केली असून कोणीही मैदानामध्ये यापुढे वाहने पार्किंग करू नये यासाठी मैदानाच्या दरवाजांना टाळे लावण्यात आले आहे तसेच मुलांना मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापुढे मैदानात कोणी अवैध पार्किंग केली, तर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी दिली.
