नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करीत मौलिक सूचना*
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करीत मौलिक सूचना*
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या दि.15 जानेवारी 2026 रोजी होणा-या सार्वत्रिक निवडणूकीकरिता आठही विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये कार्यान्वित झाली असून आज महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी या सर्व कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देत निवडणूक विषयक सर्व बाबींची व सुविधांची पाहणी केली व मौल्यवान सूचना केल्या. तसेच त्याठिकाणी आणखी आवश्यक असणा-या सुविधांची तत्पर पूर्तता करण्याचे निर्देश संबधित अधिका-यांना दिले. याप्रसंगी आयुक्त महोदयांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड उपस्थित होते.
बेलापूर विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून पाहणीला सुरुवात करीत संपूर्ण दिवसभर आयुक्तांनी दिघा विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत आठही कार्यालयांना अथक भेटी देत पाहणी केली.
यामध्ये प्रत्येक विभागातील प्रभागनिहाय मतदान केंद्रांचा आढावा घेतांना त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात क्षेत्रीय अधिकारी उपलब्ध असल्याबाबत त्यांनी खातरजमा केली. त्याचप्रमाणे आवश्यक क्षेत्रीय अधिकारी तत्परतेने पुरवावेत असेही निर्देश मनुष्यबळ व्यवस्थापन करणा-या नोडल अधिकारी यांना दिले.
सर्व आठही विभागात आचारसंहिता उल्लंघनावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडीओ सर्विलन्स पथके कार्यान्वित झाली असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्याची सूचना आयुक्तांनी केली. महानगरपालिकेव्यतिरिक्त इतर प्राधिकरणांच्या कर्मचा-यांना महापालिका निवडणूक कामकाजाची नेमणूक पत्रे बजावण्यात आलेली आहेत, मात्र त्यामधील जे कर्मचारी कर्तव्यावर हजर झालेले नाहीत अशा कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून 24 तासाच्या आत हजर होण्याच्या सूचना कराव्यात अन्यथा त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येईल अशा स्पष्ट नोटीसा द्याव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले.
सर्वच ठिकाणी निश्चित केलेल्या स्ट्राँग रुमच्या जागा व मतमोजणीच्या जागा यांची पाहणी करुन व त्याचे आराखडे तपासून त्यामध्ये आवश्यक सुधारणा आयुक्त महोदयांनी सूचविल्या. मतदान व मतमोजणी लगेचच लागोपाठ दिवशी असल्याने मतदान व मतमोजणी प्रसंगी कर्मचारी नेमणूका वेगवेगळया असाव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.
सर्व ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही व्यवस्थेची कार्यालयाचा सर्व भाग समावेश करुन घेईल अशाप्रकारे मांडणी करावी व कार्यालयांमध्ये वेळेची नोंद करण्यासाठी मोठे घड्याळ असावे अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टींच्याही सूचना आयुक्तांनी केल्या. मतमोजणीच्या ठिकाणी मोठया स्क्रिन असाव्यात असेही सूचित करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणारी संख्या लक्षात घेता सर्व कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात बैठक व्यवस्था असणारे प्रतिक्षा कक्ष असावेत असेही त्यांनी सूचित केले.
सर्व कार्यालयांमध्ये नोंदणी कक्ष, मदत कक्ष, अर्ज तपासणी कक्ष, ना हरकत प्रमाणपत्रे स्विकृती कक्ष असे विविध कक्ष कार्यान्वित असून त्याठिकाणी लावलेले कक्षांचे फलक ठळक आणि वेधक असावेत अशा सूचना त्यांनी केल्या.
बेलापूर विभागात प्रभाग क्र.25,26,27,28 अशा चार प्रभागात 158 मतदान केंद्रे, नेरुळ विभागात प्रभाग क्र.21,22,23,24 अशा चार प्रभागात 180 मतदान केंद्रे, वाशी विभागात प्रभाग क्र.16,17,18 अशा तीन प्रभागात 125 मतदान केंद्रे, तुर्भे विभागात प्रभाग क्र.14,15,19,20 अशा चार प्रभागात 159 मतदान केंद्रे, कोपरखैरणे विभागात प्रभाग क्र.10,11,12,13 अशा चार प्रभागात 160 मतदान केंद्रे, घणसोली विभागात प्रभाग क्र.06,08,09 अशा तीन प्रभागात 110 मतदान केंद्रे, ऐरोली विभागात प्रभाग क्र.04,05,07 अशा तीन प्रभागात 121 मतदान केंद्रे व दिघा विभागात प्रभाग क्र.01,02,03 अशा तीन प्रभागात 135 मतदान केंद्रे, अशाप्रकारे 28 प्रभागांमध्ये एकूण 1148 मतदान केंद्रे असून त्याठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा व व्यवस्थेचा आयुक्तांनी बाबनिहाय आढावा घेतला.
ही सर्व मतदान केंद्रे जीओ टॅगिंग करुन घ्यावीत व गाड्यांनाही जीपीएस सिस्टिम बसवावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
मतदान केंद्रांची ठिकाणे तीन ते चार दिवस आधी शालेय व संबंधित व्यवस्थापनांकडून निवडणूक कामकाजासाठी ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी दिले.
विभागांमध्ये महिला स्पेशल – पिंक बूथ, स्वच्छता व वसुंधरा बूथ अशी विशेष मतदान केंद्रे स्थापित करावीत असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
ज्या शाळांमध्ये मोठया संख्येने मतदान केंद्रे आहेत अशा ठिकाणी मतदारांची गैरसोय होणार नाही याची काळजी आत्तापासूनच घेऊन त्यानुसार नियोजन करावे असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
बेलापूर विभागापासून सकाळी सुरुवात करीत नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली ते दिघा अशा आठही विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांना अथकपणे प्रत्यक्ष भेट देत, तेथील कामकाजाची पाहणी करीत व त्यांना मौलिक सूचना देत नमुंमपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुव्यवस्थितपणे व पारदर्शक रितीने पार पाडण्यासाठी प्रत्येक संबधित घटकाने कर्तव्य भावनेने काम करावे असे सूचित केले.
