Breaking News

खारघर नोडमध्ये सिडकोची धडक कारवाई... अनधिकृत झोपड्यांसह स्टॉल्स, गोठे,नर्सरी गॅरेजवर हातोडा

खारघर नोडमध्ये सिडकोची धडक कारवाई... अनधिकृत झोपड्यांसह स्टॉल्स, गोठे,नर्सरी गॅरेजवर हातोडा

नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार काल सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं) विभागामार्फत खारघर नोड येथे अनधिकृत बांधकामे निष्काषणाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत, केंदीय विहार मेट्रे स्टेशन येथील सार्वजनिक सोयी सुविधांकरिता राखीव असलेल्या भूखंडावरील अनधिकृत चौथरा निष्कासित करण्यात आला. सेक्टर ३० येथील अनधिकृत गॅरेज निष्कासित करण्यात आला. तसेच कॉर्पोरेट पार्क करीता राखीव भूखंडावरील अनधिकृत बांधकामाचा १ गाईंचा गोठा, १ नर्सरी, १ वॉशिंग सेंटर, ५ झोपड्या, १ रसवंती गृह निष्कासित करण्यात आले. भूखंड क्र. १४ व १५, सेक्टर ३५ डी येथे निष्कासन मोहिम राबवून सिडकोच्या जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ २००० चौ. मी. वरील अनधिकृत बांधकाम केलेल्या १६ झोपड्या हटविण्यात आल्या. भूखंड क्र. २० बी, सेक्टर 3५ बी येथील सामाजिक सुविधा भूखंडावरील ६ अनधिकृत स्टॉल्स तसेच भूखंड क्र.३०, सेक्टर ३४ सी येथील सामाजिक सुविधा भूखंडावरील ७ अनधिकृत स्टॉल्स निष्कासित करण्यात आले. उपरोक्त सर्व नमूद अतिक्रमणे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली असल्यामुळे ती निष्कासित करण्यात आली असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे कारवाईची ही मोहिम राबविण्यात आली. या कारवाईसाठी ८ लेबर , १ जेसीबी, १ ट्रक, २ जीप यांचा वापर करण्यात आला.


Most Popular News of this Week