Breaking News

वाशीत टपऱ्यांवर महापालिकेची जोरदार कारवाई

वाशीत टपऱ्यांवर महापालिकेची जोरदार कारवाई

वाशी (प्रतिनिधी)-नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणे व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली असून काल वाशी विभाग कार्यालय अंतर्गत विना परवाना व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. मागील अनेक दिवसांपासून वाशी रेल्वे स्थानक परिसरात सिडकोच्या अंतर्गत असणाऱ्या व्यावसायिक भूखंडावर प्रतिबंधित असणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने मांडून विक्री सुरू होती. त्या दुकानांवर वाशी विभाग कार्यालयाने काल धडक मोहीम राबवून दुकाने हटविली आहेत. पालिकेच्या या मोहिमेमुळे विनापरवाना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईतून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधितांवर ६३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. मात्र असे असताना वाशी रेल्वे स्टेशन परिसरात गजबजलेल्या ठिकाणी हॉटेल आणि इतर व्यवसायिकांच्या अंतर्गत परिसरात विनापरवाना तंबाखूजन्य पदार्थांचे विक्री करणाऱ्या टपऱ्या टाकण्यात आल्या होत्या. शनिवारी वाशी रेल्वे कीऑक्स, मिनी मार्केट रेस्टॉरंट व बार समोरील पान टपऱ्या महापालिकेने हटवल्या. या कारवाईत सुमारे १८ ते २० पान टपऱ्या आणि छुप्या पद्धतीने विक्री करणारे स्टॉल पालिकेने हटवून ते डम्पिंग ग्राउंडवर जमा केले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल गेठे, अतिक्रमण उपायुक्त कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकातील अधिकारी, व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही कारवाई केली.


Most Popular News of this Week