आंतरराष्ट्रीय परिषदेत नवी मुंबई महापालिकेचे 'मॅनहोल टू मशीनहोल” या विषयावर प्रभावी सादरीकरण
आंतरराष्ट्रीय परिषदेत नवी मुंबई महापालिकेचे 'मॅनहोल टू मशीनहोल” या विषयावर प्रभावी सादरीकरण
नवी मुंबईची कार्यप्रणाली अंगीकारण्याबाबत अनेक देश सकारात्मक
नवी मुंबई (प्रतिनिधी) - वर्ल्ड टॉयलेट समिट २०२५" या जागतिक स्तरावरील परिषदेत नवी मुंबई महापालिकेस मॅनहोल टू मशीनहोल"या यशस्वी अंमलबजावणी झालेल्या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवी मुंबई महापालिकेस आपले उल्लेखनीय उपक्रम मांडण्याची संधी मिळणे हा महापालिकेचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मान्यतेने व अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नमुंमपा उपअभियंता स्वप्नील देसाई यांनी मॅनहोल टू मशीनहोल -ऑपरेशन्समधील कार्यक्षमता"या विषयावर नवी मुंबई महापालिकेचे प्रतिनिधित्व करुन प्रभावी सादरीकरण केले. या माहितीपूर्ण सादरीकरणाची विविध देशातील उपस्थित प्रतिनिधींनी प्रशंसा केली. तसेच अनेक देशाच्या प्रतिनिधींनी या मॉडेलचा अभ्यास करुन ही कार्यप्रणाली अंगीकारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनचे संस्थापक जॅक सीम यांच्या हस्ते नवी मुंबई महापालिकेचा सन्मान करण्यात आला. या परिषदेस भूतान, कॅनडा, कतार, द.आफ्रिका, सिंगापूर, थायलंड, बांग्लादेश, स्वीडन व इतर देशांतील तसेच भारतातील विविध मोठ्या शहरांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत नवी मुंबई महापालिकेच्या मलनि:स्सारण व्यवस्थापनातील स्वच्छता प्रणालीची माहिती देण्यासाठी महापालिकेस आमंत्रित केले जाणे हा महापालिकेचा जागतिक पातळीवर झालेला गौरव आहे.
