दिव्यांगाना महापालिका सर्वतोपरी मदत करणार - भिवंडी मनपा आयुक्त अनमोल सागर यांची ग्वाही
दिव्यांगाना महापालिका सर्वतोपरी मदत करणार - भिवंडी मनपा आयुक्त अनमोल सागर यांची ग्वाही
भिवंडी (वार्ताहर) - भिवंडी शहरातील दिव्यांगांना पालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असून,पालिकेकडून सुरू केलेल्या दिव्यांग पोर्टलवर दिव्यांग नागरिकांनी आपली माहिती भरून योग्य तो लाभ घ्यावा असे आवाहन भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने भिवंडी महापालिका मुख्यालयात समाज कल्याण विभागा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग कार्यालयाच्या व दिव्यांग पोर्टलचे उदघाटन प्रसंगी आयुक्त बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,नयना ससाणे, उपायुक्त विक्रम दराडे,सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे दिव्यांग सेवा संस्थेचे अशोक भोईर, नरेश तरे आदींसह महापालिका सेवेतील दिव्यांग कर्मचारी व शहरातील दिव्यांग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग हे समाजातील सर्वात मोठा घटक आहे, त्यांना सर्व प्रकारच्या समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांना मदतीचा हात पुढे करणे, त्यांच्या कामात त्यांना योग्य ती मदत करणे तसेच शासन नियमाप्रमाणे व महानगरपालिकेने निर्णय घेतल्या प्रमाणे दिव्यांग व्यक्ती यांना लाभ देण्यात येतील असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले. यावेळी पालिका सेवेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाचे विभाग प्रमुख मिलिंद पळसुले, यांच्या नेतृत्वाखाली विभागातील समीर मुंढे, अमीन अन्सारी, अमोल देसले कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांग कर्मचारी अलका मटाले यांनी केले. दरम्यान, भिवंडी महापालिकेने सुरू केलेल्या दिव्यांग पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांना घरबसल्या आपली नोंद करता येणार असून शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात या सेवांचा लाभ दिव्यांगाने घ्यावा असे आवाहन आयुक्त अनमोल सागर यांनी केले आहे.
