Breaking News

सीवूडस-दारावे रेल्वे स्थानकासाठी आता सीवूड दारावे-करावे अशी ओळख!

सीवूडस-दारावे रेल्वे स्थानकासाठी आता सीवूड दारावे-करावे अशी ओळख!

नवी मुंबई (प्रतिनिधी) - केंद्र आणि राज्य सरकारकडून मुंबईसह इतर ठिकाणी रेल्वे स्थानकांना असणारी जुनी नावे बदलून नवीन नावे दिले जात आहेत. आता त्यात नवी मुंबई शहरातील ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर असणाऱ्या सीवूड्स-दारावे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून सीवूड्स-दारावे-करावे असे होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी देत नामांतर करण्यासाठी नोटोफिकेशन घोषित केले आहे. दरम्यान, सीवूड-दारावे या रेल्वे स्थानकाचे नामकरण सीवूड़ दारावे-करावे असे करण्यात यावे अशी आग्रही मागणी येथील भाजपचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे व माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांची सुरूवातीपासून राहिली आहे व यासाठी त्यांनी केंद्र सरकारसह इतर विविध यंत्रणांकडे पाठपुरावा केला होता. अखेरीस त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.

सीवूड दारावे या स्थानकाचे नव्याने “सीवूड्स-दारावे-करावे' असे नामकरण झाल्याचे फलक रेल्वे स्थानकात उभारावे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आणि माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी केली आहे. जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक त्याच प्रमाणे रेल्वे स्थानकाचे उभारणी करणारे सिडको प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सांगितले की, सीवूड रेल्वे स्थानकाचे सीवूड्स-दारावे-करावे असे नामकरण करण्याचा प्रस्ताव वर्ष २००३ मध्ये तत्कालीन नगरसेवक सुधाकर म्हात्रे यांनी महापालिकेत मांडला होता. मात्र प्रस्ताव मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा रखडल्याने पुढील प्रक्रिया सुरू झाली नव्हती. करावे गावचे लोकप्रतिनिधी पद भूषवित असताना जनतेच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न म्हणून यासाठी माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिकेने मांडलेला ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर राज्य शासनाला त्याचे पत्र पाठवण्यात आले. राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर २८ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या पत्राअन्वये राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र सरकारने राजपत्र काढून सीवूड्स-दारावे-करावे असे नामकरण करण्यात आल्याचे घोषित केले. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता. केंद्र शासनाने याबाबतचे गॅझेट सादर करून मंजुरी दिली. त्यानुसार दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार सीवूड दारावे रेल्वे स्थानकासाठी सीवूड्स-दारावे-करावे अशा नामकरणाची मंजुरी देण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची उभारणी ही प्रामुख्याने सिडको प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा प्रश्न हा सिडको अंतर्गत येत असल्याने सिडको महामंडळालाही याबाबतचे निवेदन देऊन रेल्वे स्थानकात नव्याने सीवूड्स-दारावे-करावे या नावाचे फलक उभारण्याची मागणी मा.नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी केली आहे. तर रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या या प्रशनासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांची अनेकदा भेट घेऊन तसेच प्रसंगी जनता दरबारात निवेदन देऊन याविषयी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेरीस त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच सीवूड्स दारावे रेल्वे स्थानकाला नवे नाव दिले जाणार आहे.


Most Popular News of this Week