केडीएमसी रुग्णालयातील आयसीयु सेवा बंद... मनसेचे ऑक्सिजन सिलेंडरसह मास्क लावून केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन...
केडीएमसी रुग्णालयातील आयसीयु सेवा बंद... मनसेचे ऑक्सिजन सिलेंडरसह मास्क लावून केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन...
कल्याण(वार्ताहर) - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामधील आय.सी.यू गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बंद असल्याने रूग्ण नागरिकांची गैरसोय होण्यासह त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येप्रकरणी केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासह प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनसैनिकांनी काल ऑक्सिजन सिलेंडरसह मास्क लावून केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन करून महापालिकेचा निषेध नोंदविला. यावेळी लवकरात लवकर आयसीयू सुरु न केल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मनसैनिकांकडून देण्यात आला. कल्याण पश्चिम विभागात असलेल्या सरकारी बाई रुक्मिणीबाई रुग्णालया मध्ये गरजू नागरिक उपचारासाठी येतात. परंतु अपूर्ण सुविधांमुळे नागरिकांना मुंबई व इतर ठिकाणी उपचार घेण्यासाठी पाठवले जाते. गेल्या दोन वर्षांपासून रुक्मिणीबाई रुग्णालया मधील सुसज्ञ़ असे आयसीयु असून देखील सुरु करण्यात आले नाही. ते लवकरात लवकर चालू करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. परंतु आरोग्य विभाग अधिकारी यांना कल्याण मधील नागरिकांचे काही पडले नाही. दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली मधील आयसीयू नसल्यामुळे सर्पदंश मुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यातून देखील महापालिकेने काहीही बोध घेतला नाही. सोमवारी देखील आयसीयु उपलब्ध नसल्यामुळे एक महिलेला दोन तासानंतर दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले. वाहतूक कोंडीमुळे वेळेत मुंबई येथील रुग्णालयामध्ये न पोहचल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याकरिता लवकरात लवकर बाई रुक्मिणीबाई रुग्णालया मधील सुसज़ आयसीयु चालू करावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क आणून तोंडाला लावत केडीएमसी मुख्यालयात ठिय्या मांडत आंदोलन केले.
