घणसोली येथील श्री देवकादेवी मंदिराला सिडकोची नोटीस
न्यायासाठी कोर्टात जाण्याचा विश्वस्त मंडळाचा इशारा
घणसोली (प्रतिनिधी) - घणसोली ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीदेवका देवी मंदिराला सिडकोने नोटीस बजावली आहे. सिडकोने बजावलेली ही नोटीस बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत, या नोटीसीविरोधात न्याय मागण्यासाठी कोर्टात धाव घेण्याचा इशारा विश्वस्त मंडळाकडून देण्यात आला आहे. सिडकोने नवी मुंबई परिसरातील अनेक जागेवरील अनधिकृत बांधकामे यांना कायदेशीर नोटीस पाठवून सदरची बांधकामे, जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत असे आदेश दिले आहेत. अशाच प्रकारचा आदेश सिडको प्रशासनाने १९३६ सालापासून अस्तित्वात असलेल्या प्लॉट नंबर १० ए, सेक्टर ११, घणसोली, येथील श्री देवकादेवी मंदिर व मंदिर परिसराच्या भोवताली असलेल्या ६४ गुंठे परिसराला अनधिकृत ठरवत या जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत. व जागेवरील ताबा सोडावा अशी नोटीस सदर मंदिराच्या विश्वस्त मंडळाला दिली आहे. या नोटीसीमुळे श्री देवकादेवी सेवाभावी मंडळ घणसोली गाव व ग्रामस्थ यांच्यामध्ये सिडकोविरोधात तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. मंडळाच्या विश्वस्तांनी व ग्रामस्थांनी श्री देवकादेवी मंदिर व परिसरातील ६४ गुंठे परिसरावर सिडकोने कोणतेही कारवाई करू नये व १९३६ पासून अस्तित्वात असलेल्या मंदिराला व आजूबाजूच्या ऐतिहासिक व धार्मिक परिसराला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे.
सिडकोतर्फे या जमिनीवर, मंदिरावर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मंदिराच्या विधस्त मंडळानी व ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाला दिला आहे. मंदिरावर सिडको प्रशासनाने कारवाई करू नये, मंदिराला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळानी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, विभागीय कोकण आयुक्त, आमदार मंदा म्हात्रे, व्यवस्थापकीय संचालक सिडको प्रशासन, वरिष्ठ नियोजनकार (उत्तर )सिडको, मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभाग सिडको बेलापूर आदी ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. मंदिराचे शासनाने संरक्षण करणे बंधनकारक आहे. ७५ वर्षापेक्षा जास्त जुने धार्मिक स्थळ संरक्षित, सांस्कृतिक वारसा मध्ये मोडण्याची तरतूद आहे. त्यामुळे शासनाने या मंदिरावर व मंदिर परिसरातील ६४ गुंठे जागेवर कारवाई करणे चुकीचे आहे असे मत यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील यांनी मांडले.
सिडकोने भूमिपुत्रांवर अन्याय करू नये
मौजे घणसोली येथे सन १९३६ सालापासून अस्तित्वात असलेले श्री देवकादेवी मंदिर हे ग्रामस्थांचे ऐतिहासिक व धार्मिक केंद्र आहे. आम्हा स्थानिक भूमीपुत्रांच्या वंशपरंपरागत चालत आलेल्या जमिनीवर,मंदिरावर जर कारवाई होणार असेल तर त्याला आम्ही कायदेशीररित्या विरोध करू. सिडको प्रशासनाने स्थानिक भूमीपुत्रावर अन्याय करू नये अशी आम्ही विनंती करत आहोत.
- भारत फुलचंद पाटील, श्री देवकादेवी सेवाभावी मंडळ, घणसोली गाव
