Breaking News

पैशांच्या हव्यासामुळे जावयाकडून सासुची हत्या

पैशांच्या हव्यासामुळे जावयाकडून सासुची हत्या

उरण पोलीसांनी जावयाच्या आवळल्या मुसक्या 
उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील वृद्ध  सासूची हत्या करणाऱ्या जावयाकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू पोलीसांनी जप्त केल्या आहेत. तर, या प्रकरणात आरोपी सुरेश पाटील याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 
उरण तालुक्यातील भोम येथील हिराबाई जोशी (९०) यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कोणताही ठोस पुरावा नसताना उरण पोलीसांनी शिताफीने आरोपी जावई सुरेश पाटील याला अटक केली आहे. यामध्ये, सासूबाईंनी विकलेल्या जमिनीच्या पैशातील अधिकची रक्कम मिळावी अशी मागणी सुरेशने केली होती. परंतु, सासूबाईंनी सुरेश याला वाढीव रक्कम देण्यास मनाई केल्याने त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. 
तर, घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास सुरेश हा सासूबाईंच्या घरी जाऊन वाढीव रकमेची मागणी करीत बाचाबाची झाली होती. याच  वेळेस सुरेश याने हिराबाई यांच्या डोक्यावर लाकडी फळीने हल्ला केल्याने त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. यावेळेस, सुरेश याने जवळच असलेल्या दगडी वरवंटा घेऊन पुन्हा सासूबाईंच्या छातीवर हल्ला करून पळून गेल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी सांगितले आहे. 
तर, या प्रकरणात पोलीसांनी पुरावे जमा केले असून हत्येसाठी वापरण्यात आलेली लाकडी फळी, दगडी वरवंटा आणि हत्येच्या दिवशी घातलेले कपडे जप्त केले आहेत. तर, या गुन्ह्याच्या तपासासाठी आणखी पुरावे जमा करण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी सांगितले आहे. तर, आरोपी सुरेश याला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.


Most Popular News of this Week