Breaking News

एक नगरसेवक है, वही सबको काफी है...!

एक नगरसेवक है, वही सबको काफी है...!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत वैकुंठ रथ सेवेचे लोकार्पण; मनसे कार्यालयाचे उद्घाटन - नेरुळ (वार्ताहर) – नवी मुंबई महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणखी नगरसेवक निवडून यायला पाहिजे होते, मात्र तरीही अभिजीत देसाई यांच्या रुपाने नवी मुंबई महापालिकेत मनसेने जोरात प्रवेश केला आहे असे सांगतानाच, एक नगरसेवक है वही सबको काफी है अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नवी मुंबईत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुरु करण्यात आलेल्या वैकुंठ रथ' या शववाहिनी सेवेचे तसेच नेरूळ येथील मनसे नगरसेवक अभिजित देसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन हे दोन्ही कार्यक्रम काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरूळ सेक्टर २ येथे पार पडले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. मे महिन्यात आपण पुन्हा येऊन जाहीर सभेत इतर गोष्टींबाबत गौप्यस्पोट करू असा इशाराही यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना यावेळी दिला. नवी मुंबई महापालिकेतील मनसेचे प्रथम नगरसेवक अभिजीत देसाई यांच्या पुढाकारातून वैकुंठ रथ सेवा सामाजिक जाणिवेतून सुरू करण्यात आली आहे. व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या अंतिम प्रवासात कुटुंबीयांना अनेक भावनिक आणि व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागतो, अशा वेळी वेळेवर आणि सुलभ शववाहिनी उपलब्ध व्हावी, ज्यात अंतिम धार्मिक संस्कार करणे सुलभ व्हावे यासाठी हा वैकुंठ रथ' सुरू करण्यात आला आहे. विशेषतः सामान्य कुटुंबांना दिलासा देणारी सेवा सुरू करण्याचा आपला हा छोटासा निर्णय असून, अंतिम संस्कारासारख्या प्रसंगी होणारी गैरसोय कमी करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी नगरसेवक अभिजित देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले. प्रभाग क्रमांक २२ (नेरूळ - जुईनगर - सानपाडा) मधील नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडता याव्यात आणि स्थानिक प्रश्नांवर तात्काळ पाठपुरावा व्हावा, यासाठी सदर कार्यालय सुरू केले आहे असेही नगरसेवक देसाई यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मनसेचे माजी आ. राजू पाटील यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन काळे, शिवसेना (उबठा) चे नगरसेवक विशाल डोळस, विकी विचारे, राजेश पोसम आदींसह मनसे नवी मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week