Breaking News

शालेय गणवेश वाटपास विलंबाचे खापर शिक्षण विभागावर ?

शालेय गणवेश वाटपास विलंबाचे खापर शिक्षण विभागावर ?

नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंगळवारी बाळवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एकूण ५० हजार ५५८ विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ साठी शालेय गणवेश, पीटी गणवेश व स्काऊट गाईड गणवेश पुरवठा करण्याकरिता १३ कोटी ३३ लाख इतक्या रक्कमेस मान्यता देण्यात आली. तसेच बाळवाडी शिकणाऱ्या साधारणत: ७४४६ विद्यार्थ्यांसाठी मुलभूत शिक्षणाच्या दृष्टीने लेखन साहित्याचा पुरवठ्यापोटी १ कोटी ३३ लाख रक्कमेत मान्यता देण्यात आली. मात्र येत्या जूनमध्ये सुरु होणाऱ्या शाळांचे वर्ग लक्षात घेता, शालेय मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणे अशक्य असून काल स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करतांना या गणवेश व शालेय साहित्य विलंबाचे खापर अप्रत्यक्षपणे प्रशासनावर फोडण्यात आले. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महापालिकेच्या काल पार पडलेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनातर्फे विविध नागरी सेवासुविधांचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. या सभेत सदस्यांच्या चर्चेनंतर विविध सेवा सुविधा कामांना मंजूरी प्राप्त झाली. यामध्ये प्रामुख्याने मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी स्वतःहून दाखल करुन घेतलेल्या (सुमोटो) पीआयएल क्रमांक.३/२०२३ अन्वये पारित केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने घणसोली कौल आळी व तुर्भे से १९ येथील स्मशानभूमीमध्ये पर्यावरण पुरक स्मशानभूमी बांधण्याचे काम महापालिकेने प्रस्तावित केले आहे. सदर हायब्रीड क्रिमॅटोरिअम पध्दतीमध्ये सुरूवातीला २ स्मशानभूमींचे रुपांतर करणेसाठी रुपये २ कोटी ८७ लाख रक्कमेच्या कामास स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झालेली आहे. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या १५ शाळांमध्ये टिंकरिंग लॅबोरेटरी स्थापन करण्यासाठी रु. १ कोटी ४७ लाख रक्कमेस, नमुंमपाच्या शिक्षण विभागांतर्गत बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एकुण ५०, ५५८ विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ वर्षासाठी शालेय गणवेश, पी. टी. गणवेश व स्काऊट गाईड गणवेश पुरवठा करण्याकरिता रु. १३ कोटी ३३ लाख रक्कमेस तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये बालवाडीत शिकणाऱ्या साधारणतः ७४४६ विद्यार्थ्यांसाठी मुलभूत शिक्षणाच्या दृष्टीने लेखन साहित्याचा पुरवठा करण्याकामी १ कोटी ३३ लाख रक्कमेस वित्तीय मान्यता देण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पांतर्गत ७ गावे व ८ वाड्या विस्थापित झालेल्या असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या पुनर्वासित गावांना पाणी पुरवठ्यासह १३ नागरी सुविधा देण्यात आल्या होत्या. हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नवी मुंबई महापालिकेस हस्तांतरित झालेले असून १३ सुविधांपैकी देखभाल व दुरुस्तीसह पाणीपुरवठा सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात येत आहे. मोरबे गावाच्या पाणी पुरवठ्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेली मुख्य जलवाहिनी साधरणत: २८ वर्ष जुनी झालेली असून ती वारंवार नादुरुस्त होत असल्याने नव्याने जलवाहिनी टाकणे व अनुषांगिक कामांसाठी रु. ६५ लक्ष ८७ हजार रक्कमेच्या कामास तसेच महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ एमबीआर येथे काही ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने व काही ठिकाणी संरक्षक भिंत तुटलेली असल्याने व तेथील डीजी सेट आणि क्लोरिन युनिटची पत्र्याची जुनी खोली पूर्णत: मोडकळीस आलेली आहे. सदर युनिटची रुम नव्याने बांधणे व संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षण भिंत बांधणे या कामासाठी ६५ लाख ४० हजार रक्कमेस, तुर्भे विभागातील अन्नपूर्णा चौक ते मयुरेश हॉटेल पर्यंतच्या सिडकोकालीन नाल्याची दूरवस्था झालेली आहे. सदरचा हा नाला एपीएमसी मार्केटलगत व वाशी तुर्भे लिंक रोडलगत असून सदर ठिकाणी आरसीसी नाला बांधण्याच्या रु.६ कोटी ९७ लाख रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली. बेलापूर विभागातील से. २५ नेरुळ या ठिकाणी एल अँड टी ब्रीजखाली संरक्षक भिंत बांधण्यासाटह रु. ५७ लाख ५८ हजार रक्कमेच्या कामास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. . घणसोली विभागातील प्रगतीनगर येथील सिध्दीविनायक अपार्टमेंट समोरील रस्त्याची टिडब्लूटी काँक्रिट पध्दतीने सुधारणा करणे व गटारे बांधणे या रु. १ कोटी ७१ लाख रक्कमेच्या कामास तसेच कोपरखैरणे से. १९ सी येथील विस्तारित कोपरखैरणे गावठाण व तीनटाकी ते जिमी टॉवर येथील दूरवस्था झालेल्या रस्त्यांची टिडब्लूटी काँक्रिट पध्दतीने सुधारणा करण्याच्या रु.४ कोटी ७८ लक्ष रक्कमेच्या कामासही स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झाली. बेलापूर विभागात आग्रोळी गाव से. ३०/३१ येथील नपुंमपा स्काडा सेंटर व भूमीराज हिल ते भाऊ सखाराम पाटील चौक से १० येथे रस्त्याच्या बाजूला पदपथ बांधणीच्या रु. ७३ लाख ७९ हजार रक्कमेच्या कामास से २ कोपरखैरणे येथील गटर व पदपथाची सुधारणा करण्याच्या रु. २ कोटी १८ लाख रक्कमेच्या कामास तसेच से. ८ कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक शाळेच्या पाठीमागील भागात असलेल्या सिडकोकालीन व दूरवस्था झालेल्या गटार व पदपथाची सुधारणा करण्याच्या रु.९५ लाख ३४ हजार रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली. यासह वाशी से. १६ ए येथील बहुउद्देशीय इमारतीत सहाव्या मजल्यावर वाशी विभाग कार्यालय असून येथील ७, ८, ९ व १० हे मजले लिव्ह अँड लायसन्स तत्वावर स्टेट बँक ऑफ इंडिया यांना भाडे तत्वावर दिले असून याठिकाणच्या स्थापत्य कामांकरिता रु.४७ लाख ४२ हजार रक्कमेस वित्तीय मान्यता देण्यात आली. नेरुळ से.१९ मध्ये असलेले कल्पना चावला उद्यान सुशोभिकरणासाठी रु.३० लाख ५८ हजार रक्कमेच्या कामास मान्यता प्राप्त झाली आहे. अशा विविध नागरी सुविधांच्या प्रस्तावास तसेच तुर्भे येथील पर्यावरणपूरक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करणे, तेथील सिएनडी वेस्ट प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती करणे तसेच महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या मालमत्तांवर उभारलेल्या युनिपोल होर्डिंग, गॅन्ट्रींग, फ्री स्टँडिंग युनिट, फूट ओव्हर ब्रीज व ब्रीज पॅनल या वरील जाहिरात प्रदर्शित करणे, तुर्भे से २१ येथील जलनि:स्सारण केंद्र चालविणे व देखभाल दुरुस्ती करणे अशा विविध कामांना स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झालेली आहे.


Most Popular News of this Week