Breaking News

येत्या महासभेत ठरणार कंत्राटी कामगारांचे भवितव्य !

येत्या महासभेत ठरणार कंत्राटी कामगारांचे भवितव्य !

सभागृह नेते सागर नाईक यांनी आणला नमुंमपा कंत्राटी कामगारांच्या पगार वाढीचा प्रस्ताव नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या हजारो कंत्राटी कामगारांच्या पगारात वाढ आणि नोकरीच्या सुरक्षेसाठी सभागृह नेते सागर नाईक यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. सभागृह नेते सागर नाईक यांच्यावतीने आणण्यात आलेला नवी मुंबई महापालिकेतील कार्यरत कंत्राटी कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा ठराव येत्या दि.२० मे रोजी होणाऱ्या विशेष महाभसेत मांडला जाणार आहे. त्यामुळे या महासभेत कामगारांचे भवितव्य ठरणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामुळे कामगारांच्या वेतनात वाढ आणि नोकरीच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेषकरून घनकचरा, पाणीपुरवठा व अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असल्याचे बोलले जाते. नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या पगार वाढी संदर्भातील या प्रस्तावाबाबत सभागृह नेते सागर नाईक यांनी सुचना केल्या आहेत. यात प्रामुख्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सेवा-आधारित कंत्राटी कामांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदलेल्या आर्थिक परिस्थिती, वाढलेला जीवननिर्वाह खर्च, महानगरीय कार्यपरिस्थिती व सन २०१५ पासून वेतन संरचनेमध्ये प्रभावी सुधारणा न झाल्याची बाब विचारात घेऊन नागरी सेवा संचालन विशेष भत्ता लागू करुन विद्ययमान विशेष भत्त्यामध्ये वाढ करावी तसेच महाराष्ट्र (शहरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ अंतर्गत वृक्ष प्राधिकरण स्थापन करुन त्यावरील सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, उद्यान, विद्युत विभाग, आरोग्य, महामार्ग स्वच्छता तसेच इतर विविध विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांना सरासरी २० ते २२ हजार रुपये वेतन दिले जाते. मात्र, विविध कपातीनंतर आणि महिन्याचे पूर्ण २६ दिवस काम केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या हाती जेमतेम सुमारे १८ हजार रुपयांपर्यंतच वेतन उरत असल्याचे सांगण्यात येते. ऐन महागाईच्या काळात मिळणाऱ्या या अल्प उत्पन्नामुळे या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटूंबास संपूर्ण महिना काटकसर करून जगावे लागते, तर अनेकांना अतिरिक्त रोजगार शोधण्याची वेळ येते. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी श्रमिक सेनेने नामदार गणेश नाईक यांच्याकडे कामगारांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर या विषयाला गती मिळाली असून सभागृह नेते सागर नाईक यांनी हा प्रस्ताव महासभेत मांडण्याचा निर्णय घेत तो सभागृहात आणला आहे. दि.२० मे रोजी होणाऱ्या महासभेत या प्रस्तावाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळून तो एकमताने मंजूर होईल, अशी अपेक्षा कंत्राटी कामगारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महासभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, कामगारांच्या भविष्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


Most Popular News of this Week