११ जणांच्या मृत्यूनंतर वाहतूक पोलिसांसह आरटीओ यंत्रणा जाग्या... कल्याण-मुरबाड मार्गावर ओव्हरलोडिंगवर कारवाई सुरू
११ जणांच्या मृत्यूनंतर वाहतूक पोलिसांसह आरटीओ यंत्रणा जाग्या... कल्याण-मुरबाड मार्गावर ओव्हरलोडिंगवर कारवाई सुरू
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता कल्याण ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओ विभाग जागे झाल्याचे चित्र दिसत आहे. अपघातानंतर संपूर्ण शहरात वाहनांची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. मंगळवारी आधरवाडी जेल परिसरात वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनेक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. काली- पीली टॅक्सी आणि व्यावसायिक वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून अनेक ठिकाणी कारवाईही करण्यात आली आहे. ट्रॅफिक इन्चार्ज मिलिंद झोगडे यांनी सांगितले की, शहरातील सर्व प्रमुख चौक-चौरस्त्यांवर पोलिसांची कडक नजर ठेवण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. तर सहजानंद चौकातील ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले की, सध्या कडक तपासणीमुळे रस्त्यावर काली-पीली गाड्या कमी दिसत आहेत, यावरून कारवाईचा परिणाम दिसून येत आहे. कल्याण ते मुरबाड हे सुमारे ३० किलोमीटरचे अंतर असून या मार्गावर ५० ते ६० रुपये भाडे आकारले जाते. या मार्गावर १२० हून अधिक काली-पीली इकोकारे चालवल्या जातात. मात्र अनेक टॅक्सीचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, ही ओव्हरलोडिंगची समस्या अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून ठोस कारवाई होत नव्हती. आता ११ जणांच्या मृत्यूनंतर दोन्ही विभाग खडबडून जागे झाले असून तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. कारवाई काही दिवसांपुरती मर्यादित नको तर कारवाईत सातत्य हवे... नागरिकांनी मागणी केली आहे की, सदरची ही कारवाई केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न राहता सातत्याने आणि कठोरपणे सुरू ठेवावी, जेणेकरून भविष्यात अशा अपघातांना आळा बसू शकेल. ही कडक कारवाई कायमस्वरूपी बदल घडवेल का, की काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती पूर्ववत होईल, हे पाहणे यानिमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.
