ठाणे मनपाच्या पहिल्याच महासभेत भाजप-शिवसेना शिंदे गटात खडाजंगी!
ठाणे मनपाच्या पहिल्याच महासभेत भाजप-शिवसेना शिंदे गटात खडाजंगी!
शिवसेनेविरोधात उपमहापौरांसह भाजप नगरसेविका आक्रमक
ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिकेच्या काल पार पडलेल्या पहिल्या महासभेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटातील सदस्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राजीनाम्याचा इशारा देतांनाच सभागृहातील पहिल्या दिवसाच्या कामकाजाबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. ठाणे महापालिकेत शिवसेना (शिंदे ) व भाजप ह्या महायुतीमधील घटक पक्षाची महापालिकेत सत्ता आहे. यामध्ये शिवसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद आहे. मात्र असे असले तरी काल पार पडलेल्या महापालिकेच्या पहिल्या सभेत ज्येष्ठ सदस्यांना बोलू दिले. मात्र इतर सदस्यांना बोलू न देण्याच्या महासभेतील कृतीविरोधात भाजप सदस्यांनी शिवसेनेविरोधात घोषणाबाजीचे सत्र सुरु केले होते. पहिल्या सभेला कलंक लागला व ३ वर्ष १० महिन्याचे पाप धुवून टाकले असे टिकास्त्र काही भाजप सदस्य यावेळी करतांना दिसत होते. भाजप सदस्य आपल्या भावना मांडत असतांनाच त्याविरोधात शिवसेनेचे नगरसेवक आवाज कुणाचा शिवसेनेचा अशी घोषणाबाजी सभागृहात करतांना दिसत होते. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला होता. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त करतांना सांगितले की, एखाद्या ज्येष्ठ सदस्याला बोलू दिले जाते. मात्र इतर सदस्यांना बोलू न देणे ही पध्दत फार चुकीची असून अशा स्वरूपाची महापालिकेची पध्दत मी भविष्यात पुढे चालु देणार नाही. वेळ पडल्यास भविष्यात माझ्या आसनावरून खाली उतरून कामकाज करण्यासह यांचे सगळे वाभाडे व ३ वर्ष १० महिन्यात केलेले कारनामे बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिला. तीन वर्षातील भ्रष्टाचार लपवण्याचा हा प्रकार आहे.
महासभेतील केलेल्या ठरावांना भाजपचा विरोध असून मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करून निषेध नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळप्रसंगी लोकांना हवे असलेले कामकाज व्हावे यासाठी आपला पुढाकर राहणार असल्याची आग्रही भूमिका त्यांनी यावेळी मांडली. तर भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी सांगितले की, नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न मांडणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र या सभेत प्रश्न उत्तरे व लक्षवेधी झालीच नाही व या सर्व गोंधळात सचिवांनी अवघ्या ५ मिनिटांत अजेंडा मंजूर करून संपवला असल्याचे सांगत, आम्ही जरी महायुतीत असलो तरी अशा स्वरूपाची दादागिरी खपवून घेणार नाही. आम्ही प्रश्न विचारणार व अधिकारी प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल. पुढील महासभेत जर आम्हा सदस्यांना बोलू दिले नाहीतर आम्ही सुध्दा सभा चाळू देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर अर्चना मणेरा यांनी हा सर्व गोलमाल सुरु आहे. आमचा प्रशासनाच्या एकूणच भूमिकेला विरोध असून अशा प्रकारे महासभा चालत नसते. त्यांना उत्तर द्यायचे नव्हते. पुढील वेळी बोलू दिले नाहीतर सभात्याग करू असा इशारा दिला.
भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांनी सांगितले की, प्रभागातील जांभळी नाका ते अशोक टॉकीजपर्यंतच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांना त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी निवडणूकीदरम्यान आपल्याकडे केल्या होत्या. यासंदर्भात मी सभागृहात लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र मला बोलू दिले नाही. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाची एकदा संध्याकाळी गाडी फिरते. मात्र पथक येण्याआधीच फेरीवाल्यांना फोनाफोनी होते व पुन्हा फेरीवाले बसतात. या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून मध्यंतरी हत्येची घटनाही घडली होती. एकंदरी या समस्येबाबत आवाज उठविण्यासाठी मला बोलायचे होते. मात्र नागरिक समस्यावर बोलू दिले नाही. आम्ही युतीत असलो तरी पारदर्शक कारभारासाठी भाजप आग्रही आहे. मात्र पुढच्या महासभेत बोलू दिले नाही तर आम्ही आमची ताकद दाखवू असा इशारा दिला.
