Breaking News

एपीएमसीत हापूस आंब्याच्या १०० पेट्या दाखल!

एपीएमसीत हापूस आंब्याच्या १०० पेट्या दाखल!

पावसासह थंडीमुळे यंदा हापूसला मोठा फटका; आवक घटली

नवी मुंबई (प्रतिनिधी) - हापूस आंबा म्हटलं की, सर्वप्रथम आठवतो तो कोकणची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा. त्यानुसार यंदा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या फळ बाजारात काल मंगळवार दि.१७ फेब्रुवारी रोजी हापूस आंब्याच्या १०० पेट्या दाखल झाल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील साहिल चौगुले नावाच्या शेतकऱ्याच्या बागांना आलेल्या पहिल्या मोहोराच्या १०० पेट्यांचा यात समावेश आहे. मात्र असे असले तरी यंदा कोकणातील आंब्याच्या सिझनवर पावसाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी याच हंगामात एपीएमसीत साडेचारशे ते पाचशे अशा आंब्याच्या पेट्या दाखल व्हायच्या. मात्र यंदा ८0 ते १०० पेट्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यंदा हापूस आंब्याला मोठा फटका बसला असून आवक प्रचंड घटली असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र असे असले तरी १५ मार्चनंतर मोठ्या प्रमाणात आंबा मार्केटमध्ये दाखल होईल असा विश्वास व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

एपीएमसीत दाखल झालेल्या आंब्याविषयी माहिती देतांना शेतकरी साहिल चौगुले यांनी सांगितले की, कोकणात यावर्षी आंब्याची अवस्था बिकट आहे. पावसामुळे व थंडीमुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होवून उत्पादन घटले आहे. आंब्याला डबल मोहर आल्यामुळे आंबा गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. तर घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले की, यंदा आंब्यावर मोठे संकट आले आहे. यावर्षी फेब्रुवारीत आंब्याचा चांगला सिझन येईल व शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे मिळतील अशी आशा होती. मात्र जास्तीचा पाऊस व थंडीमुळे आंब्याचे उत्पादन कमी होण्यासह आंबा गळून पडला. गतवर्षी एपीएमसीत या हंगामात ५०० पेट्या इतका आंबा दाखल झाला होता. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा अवघ्या ८० ते १०० पेट्या दाखल झाल्या आहेत. उद्या कदाचित हा आंबा दिसणार सुध्दा नाही. मात्र असे असले तरी १० ते १५ मार्चनंतर आंब्याची आवक नियमितपणे वाढेल तर साधारणपणे १५ एप्रिलनंतर आंब्याचा खऱ्याअर्थाने सिझन सुरु होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परराज्यातील आंब्याने मार्केटमध्ये बाजी मारली आहे. याचे कारण म्हणजे आता गुजरातसह केरळ, तामिळनाडू, तेलंगना व आंधप्रदेश या राज्यातही आंब्याची लागवड होवू लागली आहे. यात केरळ राज्यातील आंब्याची एपीएमसीत आवक सुरु झाली असल्याने सध्या कोकणाऐवजी साउथचा आंबा मोठ्या प्रमाणात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हा आंबा किलोच्या दराने विकला जातो तर कोकणातील आंबा डझन या दराने विकला जातो. त्यानुसार केरळमधील आंब्याचा दर सध्या कमीत कमी २०० रूपये ते जास्तीत जास्ती ६०० रूपये किलो असा आहे तर कोकणातील देवगडच्या आंब्याचा प्रतिडझन दर १५०० ते २५०० रूपये असा असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यंतरी भारत सरकार व अमेरिका या दोन देशांमध्ये ट्रेड मार्क डिलचे युध्द सुरु होते. त्यावेळी अमेरिकेने आंब्यावरील १८ टक्कयांची डयुटी तब्बळ १०० टक्के इतकी केल्यामुळे निर्यातीबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र आता अमेरिकेने आंब्यावरील निर्यात शुल्क शून्य टक्के आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आंबा जाईल व या नव्या ट्रेड डिलचा कोकणातील शेतकऱ्याला फायदा होईल असा विश्वास व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केला.


Most Popular News of this Week