वर्ष २०२७ मधील जनगणनेविषयी पहिले प्रशिक्षण सत्र नवी मुंबईत संपन्न
वर्ष २०२७ मधील जनगणनेविषयी पहिले प्रशिक्षण सत्र नवी मुंबईत संपन्न
स्वातंत्र्यानंतरच्या ८ व्या जनगणनेबाबतची कार्यवाही लवकरच...
बेलापूर (वार्ताहर)- जनगणना कार्य निर्देशालय महाराष्ट्र यांच्या वतीने जनगणना २०२७ विषयक कार्यवाही सुरु होणार असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी व जनगणनेशी संबधीत अधिकारी यांचा पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाला. याप्रसंगी सहा.संचालक जनगणना अनुमोल एम. आणि सांख्यिकी अधिकारी रुचिता तेलंग यांनी जनगणना कामकाजाविषयी सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे दिली. नवी मुंबई महापालिकेचे परिमंडळ २ उपआयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी संजय शिंदे तसेच परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांनी उपस्थित प्रशिक्षकांचे महापालिकेच्या वतीने स्वागत केले. जनगणना हे राष्ट्रीय काम असून १८७२ मध्ये पहिली जनगणना झाली होती. यापूर्वी झालेल्या २०११ च्या जनगणनेनंतर २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. तथापि कोव्हिड कालावधीमुळे त्यावेळी जनगणना होऊ शकली नाही, ती आता सुरु होत असून ही देशातील १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. या प्रसंगी बोलतांना शहर जनगणना अधिकारी तथा उपआयुक्त संजय शिंदे यांनी जनगणना हे राष्ट्रीय महत्वाचे काम असल्याचे सांगत यामध्ये केवळ मनुष्यांची संख्या माहिती करुन घेणे इतकेच हे काम मर्यादित नाही, तर देशाचा आर्थिक, सामाजिक विकास व इतर बाबींमध्ये जनगणनेतील माहितीचा उपयोग होतो असे सांगितले.
जनगणनेचे काम साधारणत: २५०० हन अधिक प्रगणक करणार असून त्यावर ४०० हून अधिक पर्यवेक्षकांचे निरीक्षण असणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे प्रमुख जनगणना अधिकारी असून उपआयुक्त संजय शिंदे हे शहर जनगणना अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. प्रत्येक विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी हे त्या विभागाचे चार्ज ऑफिसर म्हणून काम करणार आहेत. जनगणना २०२७ च्या अनुषंगाने हाऊस लिस्टींग कामकाजास पहिल्या टप्प्यात सुरुवात होणार असून त्याचे पहिले प्रशिक्षण संबधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले. जनगणना कायदा १९४८ नुसार नागरिकांमार्फत प्रगणकांना दिली जाणारी माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते व हा दस्ताऐवज केवळ केंद्रीय जनगणना विभागाच्या अखत्यारित असतो. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांनी जनगणना कामकाजासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व सत्य माहिती देऊन जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रथमच डीजीटल जनगणना... मोबाईल अँपव्दारे होणार माहितीची नोंदणी
सन २०२७ च्या या जनगणनेचे वैशिष्ट म्हणजे ही पहिली डीजिटल जनगणना असून यामध्ये मोबाईल अँपव्दारे माहितीची नोंदणी होणार आहे तसेच पत्याचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. याकरिता एचएलओ हे विशेष अँप वापरले जाणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी गटानुसार माहिती संकलीत केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची इतर माहिती संकलित केली जाणार आहे. विशेष म्हणजे नागरिक हे अँपव्दारे स्वत:च्या माहितीची नोंदणी अर्थात स्वगणना करु शकतात.
