घराणेशाहीच्या आरोपांवर मात करत दशरथ भगत कुटूंबाचे घवघवीत यश!
प्रिती भगत ठरल्या सर्वाधिक मताधिक्य मिळविणाऱ्या उमेदवार
नेरुळ (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निकालात नवी मुंबईतील नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे भाजपने ६५ जागांवर विजय संपादन करत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. या निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालात प्रभाग क्र.१८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रं.१८ मधील जनतेने भगत कुटूंबियांच्या बाजुने कौल देत, त्यांच्या जनसेवेवर विजयाची मोहोर उमटविली आहे. चौघांच्या पॅनलमध्ये भगत कुटूंबातील तिघे सदस्य आहेत. या प्रभागातील चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला आहे. त्यामुळे हा विजय केवळ निवडणूकीतील यश नसून, भगत कुटुंबाने गेल्या तीन दशकांत केलेल्या सातत्यपूर्ण आणि लोकाभिमुख जनसेवेवर जनतेने उमटवलेली ठाम मोहोर असल्याचे मानले जात आहे. या विजयामागे विकासाचा स्पष्ट अजेंडा, संघटनात्मक ताकद आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेले भगत कुटुंबाचे घट्ट नाते निर्णायक ठरले. निवडणुकीपूर्वी वाशीगाव येथे माजी महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला होता. त्यावेळीच या प्रभागात भाजपच्या विजयाची चाहूल लागली होती. प्रचार पत्रकांच्या प्रकाशनावेळी सागर नाईक यांनी भगत कुटुंबाच्या ३० वर्षांच्या जनसेवेचा विशेष उल्लेख करत मतदारांनी विकासासाठी पुन्हा एकदा या कुटुंबावर विशास टाकावा, असे आवाहन केले होते. कालच्या निकालाने त्या विश्वासाला पुष्टी दिली आहे. प्रभाग क्रमांक १८ (अ) येथील उमेदवार प्रीती संदीप भगत ह्या उच्चशिक्षित व अभ्यासू उमेदवार असल्याने मतदार राजाने मतदानात त्यांना पसंती दिली.
प्रीती भगत यांनी या निवडणूकीत १२,४७४ मते मिळवून तब्बल १०२६१ मतांच्या आघाडीने विजय मिळवला. महिलांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य व नागरी सुविधा यावर लक्ष केंद्रित करणारी त्यांची भूमिका मतदारांना भावली. १८ (ब) येथील महिला उमेदवार दयावती संपत शेवाळे यांनी ११,००२ मते मिळवून ८,८२० मतांची भक्कम आघाडी घेत विजय प्राप्त केला. तळागाळातील संपर्क या विजयात निर्णायक ठरला. प्रभाग १८ (ड) येथील उमेदवार निशांत करसन भगत यांनी ११,३५८ मते मिळवत प्रतिस्पधी उमेदवाराचा ९,०५१ मतांनी पराभव केला. युवकांचे प्रश्न, रोजगार, क्रीडा व आधुनिक नागरी सुविधांबाबतची त्यांची स्पष्ट भूमिका मतदारांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली होती. या निकालातील सर्वात महत्त्वाचा आणि राजकीय दृष्ट्या निर्णायक विजय माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांचा मानला जात आहे. प्रभाग १८ (क) येथून ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. नवी मुंबई महापालिकेचे यापूर्वी विरोधी पक्षनेते पद भूषवित असतांना त्यांनी सभागृहात लोकहिताचे मुद्दे आक्रमकपणे मांडले, प्रशासनाला जाब विचारला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या या ठाम भूमिकेवर मतदारांनी पुन्हा एकदा विधास दाखवत ११,१६८ मते त्यांच्या पारड्यात टाकून ८,३९० मतांच्या आघाडीने त्यांना विजयी केले.
महापालिकेत विरोधीपक्ष नेता म्हणून व पुढील १० वर्षांच्या काळात भगत कुटूंबातील ३ महिला नगरसेविकांच्या माध्यमातून केलेली विकास कामे व सेवा यामुळे जनसामान्यांची नाळ जुळलेला लोकप्रतिनिधी म्हणून भगत यांची ओळख कायम आहे. भगत कुटुंबाने गेल्या 30 वर्षांत प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांसाठी सातत्याने काम केले असल्याने या निवडणुकीत मतदारांनी भगत कुटुंबातील तिन्ही उमेदवारांना भरघोस मतदानाचा कौल देत विकासाची निवड केली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील विकासात्मक विचारधारेवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही स्पष्ट होते. विजयानंतर सर्व उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत, हा जनादेश प्रभाग क्रमांक १८ सह संपूर्ण नवी मुंबईच्या शाधत आणि सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी वाढवणारा असल्याची भावना व्यक्त केली आहे.
