नवी मुंबईवर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना जनता धडा शिकवेल!
माजी आ.संदीप नाईक यांचा विरोधकांवर हल्लाबोल
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईचा २५ वर्षाचा झालेला विकास व प्रगतीच्या दिशेने होत असलेली वाटचाल ही बाब शहरासाठी भूषणावह आहे. येथील नेतृत्वामुळे शहरात सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या बजेटवर वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न काही घटकांचा होत असून, येत्या १५ तारखेला नवी मुंबईतील जनता शहरावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना धडा शिकवेल व भाजपच्या बाजुने जनता कौल देईल असा ठाम विश्वास माजी आ.संदीप नाईक यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने भाजप उमेदवारांच्या प्रचाराप्रसंगी प्रसारमाध्यमांसमोर संवाद साधतांना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, गत २५ वर्षापासून शहराचे नेतृत्व करणाऱ्या नामदार गणेश नाईक यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. येथील नागरिक त्यांच्या नेतृत्वात स्वत:ला सुरक्षीत समजत आहेत. एकंदरीत नवी मुंबईतील असलेले हे चांगले वातावरण, असुरक्षित करणारे घटक वाशी सारख्या परिसरात नक्कीच आहेत. काही जणांकडून लोकांना फसवले जात आहे. आम्हाला मतदान केले तर नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागेल, अन्यथा, प्रकल्प थांबविले जातील अशा धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व भूलथापा असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न या बकासूराने केला अशा स्वरूपाची टिका यावेळी माजी आ.संदीप नाईक यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्यावर त्यांचे प्रत्यक्षात नाव न घेता केली. या बकासूराने आमच्या भाजप उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी रिर्टनिंग अधिकाऱ्यावर दबाव आणला व उमेदवारी अर्ज रद्द केला. शेवटी आम्हाला कोर्टकडून निर्णय आणावा लागला असेही त्यांनी नमूद केले. संपूर्ण वाशी परिसरातील नागरिक सुज्ञ असून, जे प्रकल्प आहेत ते कुणीही विशेषकरून बकासूरही थांबवू शकणार नाही. चांगल्या विकासासाठी भाजप उमेदवार हा पर्याय असून, भाजप उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी आ.संदीप नाईक यांनी शिवसेनेच्या ठाण्यातील नेतृत्वावर अप्रत्यक्षरित्या टिकास्त्र सोडले. ठाण्यात ठेकेदारांचे पैसे अन् कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत. नवी मुंबईत एक चांगळे शहर असून सर्व नागरिक गुण्यागोविंदाने येथे राहतात. येत्या निवडणूकीत भाजपच्या बाजुने जनता कौल देईल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नवी मुंबई महापालिकेच्या बजेटवर वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न काही घटकांचा होत असून, येत्या १५ तारखेला नवी मुंबईतील जनता वाकडी नजर ठेवणाऱ्यांना धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे निवडून येण्यासाठी त्यांनी भाजपच्या उमेदवारास बाजुला ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने आमच्या उमेदवाराच्या बाजुने निर्णय दिला असल्याने त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले आहेत अशी टिकाही संदीप नाईक यांनी शिवसेनेवर केली. तेव्हा ते आमच्या नेत्यांच्या पाया पडण्यास येतात...
भाजपची आवश्यकता असते, तेव्हा ते आमच्या नेत्यांच्या पाया पडण्यासाठी येत असतात. पदाधिकारी व कार्यकर्त्याना गयावया करतात. मात्र निवडणूक झाली की, त्यांची वागण्याची पध्दत वेगळी असते. त्यामुळे आमच्या शहराची व्यवस्था तुम्ही कोलमडणार असाल, बिल्डर्स धार्जिने तुमचे धोरण असेल व परिवर्तनाची भाषा तुम्ही करत असाल तर आधी ठाण्यात परिवर्तन करावे, बजेट निट करावे, ठाण्यातील ठेकेदारांचे पैसे द्यावे, कर्मचाऱ्यांची थकीत देणी द्यावी अशी टिका संदीप नाईक यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर केली.
