Breaking News

नवी मुंबई परिसरातील सर्व औद्योगिक वसाहती हटवा!

नवी मुंबई परिसरातील सर्व औद्योगिक वसाहती हटवा!

निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांचे लोकशाहीचा जागर कार्यक्रमात मनोगत

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महानगर अस्तित्वात आले नव्हते, त्यावेळी या परिसरात विविध औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या. पण दिवसेंदिवस नवी मुबई महानगराची आणि परिसराची वाढती लोकसंख्या विचारात घेता, लोकांच्या सुरक्षेच्या, आरोग्याच्या दृष्टीने या वसाहतींचे दुर कुठे तरी स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी एक नागरिक म्हणून बोलताना व्यक्त केली. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला लोकशाहीचा जागर हा कार्यक्रम नुकताच वाशीत पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी विविध विषयाबाबत परखडपणे आपली मते मांडत या समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी ते पुढे म्हणाले की, वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महापालिकेने दुसरे धरण बांधले पाहिजे आणि शहराचा विकास, विशेषतः वाट्टेल तिथे उभे राहत असलेल्या टोलेजंग इमारती या मुळ विकास आराखड य़ाप्रमाणे आहेत का? असा सवाल उपस्थित करून या गंभीर बाबीकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

नवी मुंबईतील पुनर्विकास प्रक्रियेवर बोलताना अनेक तज्ञांनी केवळ इमारती आणि सोसायटय़ांच्या पुनर्बांधणीचा विचार केला जात असल्याची खंत व्यक्त केली. एका इमारतीतील घरांची संख्या वाढल्याने पार्किंग, वाहतूक, रस्त्यांची रुंदी, सार्वजनिक मोकळ्या जागा आणि उद्याने यांवर प्रचंड ताण येत असल्याची बाब परिसंवादात अधोरेखीत करण्यात आली. प्रशासकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोशल ऑडिट आणि ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी करण्याची गरज असून नागरिकांनी स्वतः सजग राहून क्षेत्र समित्यांच्या माध्यमातून नागरी कामांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन महापालिकेचे निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पत्तीवार यांनी यावेळी केले. सार्वजनिक आरोग्याची सुरुवात रुग्णालयातून नव्हे तर शहर नियोजनातून होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महापालिका आणि सिडको या दोन शासकीय यंत्रणांमधील वादांचा फटका सामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना बसत असल्याचे बीएएनएमचे अध्यक्ष देवांग त्रिवेदी यावेळी म्हणाले. अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे अनेक चांगले प्रकल्प अडकून पडत असल्याची उदाहरणेही त्यांनी दिली. महिला सुरक्षेबाबत नवी मुंबईतील स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा उल्लेख स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रा. वृषाली मगदूम यांनी केला. शहरातील होल्डिंग पांड्समधील गाळ न काढल्यास भविष्यात खाडीचे पाणी शहरात शिरण्याची भिती नवी मुबई महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता डॉ. मोहन डगांवकर यांनी व्यक्त केली. इमारतींच्या पुनर्विकासापूर्वी रस्त्यांची रुंदी, सार्वजनिक वाहन तळ आणि सांडपाणी व्यवस्थेचा समावेश असलेला मास्टर फ्लॅन तयार होणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याच्या रस्ते आणि नागरी सुविधांवर प्रचंड ताण येईल, असा इशारा यावेळी जेष्ठ पत्रकार संजय सुर्वे यांनी दिला. शहर केवळ सिमेंट आणि काँक्रीटचे न बनता वाचन संस्कृती, कला, नाट्य, साहित्य आणि स्थानिक उत्सवांमधून एक वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे, असे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी सांगितले. या कार्यक्रमास विविध कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुंबईला पर्याय म्हणून निर्माण झालेल्या नवी मुंबईतही समस्यांचा सुकाळ

ज्या समस्या मुंबईत निर्माण झाल्याच्या कारणावरून मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबईची निर्मिती झाली, मात्र आज त्याच समस्या आज नवी मुंबईत निर्माण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.


Most Popular News of this Week