Breaking News

भाजप बंडखोरांचा हल्लाबोल... बंडखोर आम्ही नाहीत तर ते आहेत!

भाजप बंडखोरांचा हल्लाबोल... बंडखोर आम्ही नाहीत तर ते आहेत!

अन्यायाबाबत पत्रकार परिषदेत मांडली खदखद

नवी मुबई (प्रतिनिधी) - मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे तन मन धनाने काम केल्यानंतरही नवी मुबई महापालिका निवडणूकीसाठी भाजपच्या उमेदवार यादीमध्ये स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजपमधील काही इच्छूकांनी अखेरीस अपक्ष तर काहींनी अन्य पक्षांचा आधार घेत, निवडणूकीच्या रिंगणात उतरणे पसंत केले आहे. त्यातच काल भाजपमधील या बंडखोरांनी वाशीत आयोजित एका पत्रकार परिषदेतून आपल्यावर झालेल्या अन्यायाची खदखद व्यक्त केली. बंडखोर आम्ही नाहीत तर ते आहेत, भारतीय जनता पक्ष म्हणजे नेमका काय आहे, हे त्यांना माहितच नाही असा हल्लाबोल यावेळी विधानसभा निवडणूकीदरम्यान भाजपला रामराम करून तुतारी हाती घेतलेल्या व आता नवी मुंबई महापालिका निवडणूकीनिमित्ताने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संदीप नाईक यांच्यावर त्यांचे प्रत्यक्ष नाव न घेता करण्यात आला.

भाजपचे माजी महामंत्री दत्ता घंगाळे, आ.मंदा म्हात्रे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे पांडूरंग आमले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयश्री चित्रे, माजी महामंत्री अँड.मंगल घरत, जिल्हा उपाध्यक्ष सीमा घाग आदींनी यावेळी पत्रकार परिषदेतून आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. दत्ता घंगाळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षात कार्यरत असतांना आपण विविध स्वरूपाची चांगली कामे केली. पक्षात राहून आम्ही निष्ठेने काम केले. मात्र केलेल्या या चांगल्या कामाचे असे फळ मिळाले असल्याची खंत व्यक्त करून ज्यांना पक्षाची ध्येयधोरणे माहिती नाहीत, अशा लोकांच्या ताब्यात भाजप पक्ष सध्यस्थितीत गेला असल्याची टिकाही त्यांनी केली. पांडूरंग आमले म्हणाले की, नवी मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपमधील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. संघ व भाजपच्या कार्यप्रणालीनुसार कार्यकर्त्यांनी तन मन धन लावून काम केले. मात्र काहींनी डोळे झाकून कुणाच्यातरी दबावाखाली आम्हाला उमेदवारीत डावळण्याचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्यावर हा अन्याय झाला असला तरी आम्ही अजूनही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, म्हणून अन्य कुठल्या पक्षाचा आधार न घेता, अपक्ष म्हणून उमेदवारीच्या निवडणूकीत उतरलो असल्याचे आमले यांनी नमूद केले.

मागील ११ वर्ष भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी राहिलेल्या जयश्री चित्रे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करतांना, भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलेल्या संदीप नाईक यांच्यावर त्यांचे नाव न घेता टिकास्त्र सोडले. पूर्वी भाजपमध्ये कष्ट व मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना वर आणले जायचे. मात्र आता प्रोटोकॉल नावाचा विषयच पक्षात राहिला नसून फक्त माकडा उड्या मारणाऱ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे नमूद करून नेतृत्वावरही एकप्रकारे टिकास्त्र सोडले. सत्तेसाठी काही लोक जिल्हाध्यक्षपद सोडून तुतारीत गेले व आता महापालिकेत सत्ता येणार असल्याचे पाहून पुन्हा भाजपमध्ये आले असल्याचे सांगत, बंडखोर आम्ही नाहीत तर ते आहेत, भाजप संपविण्याचा काहीजण विडा घेवून आले आहेत असे सांगितले. अँड. मंगल घरत यांनीही यावेळी आपल्यावर झालेल्या अन्याबाबत बोलतांना सांगितले की, आम्ही भाजपात काम करत असतांना प्रत्येक घराघरात पक्ष पोहचविण्यासह सदस्य मोहिम राबविण्यावर भर दिला. मात्र त्यानंतरही झालेल्या अन्यायानंतर आम्ही हरलो नाहीत व आमचा निर्धार आम्ही अजून सोडला नाही. कमळ चिन्हावर आतंकवादी उभा राहिल्यास निवडून येईल या गोष्टीला कुठेतरी छेद देण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री व पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अन्य सहकारी मित्र पक्षातुन आलेल्यांना प्रवेश व उमेदवारी दिली जाणार नाही असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिली हे आमचं दुर्देव असल्याची खंत व्यक्त केली.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...