Breaking News

नवी मुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळी... शिवसेनेचा जाहीरनामा प्रकाशित!

नवी मुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळी... शिवसेनेचा जाहीरनामा प्रकाशित!

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना (उबाठा)-मनसे, भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रकाशित केलेला असतांनाच काल वाशीत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. दरम्यान, गुरुवारी भाजपने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात प्रामुख्याने शहरात पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी आणखी एक धरण घेणार असल्याचे जाहीर केले असतांनाच, शिवसेनेने काल प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात नवी मुंबईकरांना २४ तास आणि शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पोशीर आणि शिवार या दोन धरणांची निर्मिती करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेने पाणी पुरवठ्याच्या नवी मुंबईतील या प्रश्नाबाबत भाजपच्या जाहीरनाम्यावर एकप्रकारे री ओढत एकप्रकारे अनुकरण केल्याची चर्चा होतांना दिसत आहे.

शनिवारी वाशीतील एका हॉटेलमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते तथा खा.नरेश म्हस्के उपनेते विजय नाहटा, संपर्कप्रमुख अंकुश कदम, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्रारकानाथ भोईर, ऐरोली विधानसभा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शीतल कचरे आदींच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात प्रामुख्याने शहरातील पार्किंगची समस्या सुटावी यासाठी सुनियोजीत पध्दतीने वाहनतळाची निर्मिती आणि पार्किंग धोरणाची अंमलबजावणी, नवी मुंबईकरांना मोकळे रस्ते आणि पदपथ मिळावेत यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, शहरातील विशिष्ट भागात फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोनची निर्मिती, नवी मुंबईकरांना पाणीपट्टी आणि मालमत्ता करात पुढील पाच वर्षात कोणतीही वाढ केली जाणार नाही. नवी मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरात राहणाऱ्यांना मालमत्ता करात संपूर्ण सुट, शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एसआरए, एसआरडी आणि क्लस्टर योजनेची सुयोग्य अंमलबजावणी करण्यावर भर देणार,नवी मुंबई शहर प्रदुषणमुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने ठोस उपायांची आखणी, वाशी ते कोपरखैरणे आणि पुढे घणसोली ह्या उन्नत मार्गासाठी ठोस पाठपुरावा तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विकासाची आखणी या अंतर्गत प्रामुख्याने नवी मुंबईतील पासपोर्ट कार्यालय पूर्णक्षमतेने कार्यान्वित करणे, नवी मुंबईत स्वतंत्र व्हिसा कार्यालय शाखा उभारणे, नवी मुंबई विमानतळ ते मेट्रो ह्या कनेक्टिविटीसाठी पाठपूरावा करणे, मानखुर्द नवी मुंबई मेट्रो प्रकल्प सुरु करणे, एआयएमएसच्या धर्तीवर नवी मुंबई आरोग्य सुविधा केंद्र उभारणे, पर्यटनदृष्टया नवी मुंबईचा नावलौकिक वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पर्यटन प्रकल्पांची आखणी करणे, नवी मुंबईत आयआयटी, एनआयटी ह्यासारख्या प्रशिक्षण संस्थांसाठी जागा आरक्षीत करणे, नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी केंद्र सरकाच्या माध्यमातून मत्स्योद्योग मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे, नवी मुंबईतील मुळ भूमिपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित करण्यासाठी धोरण आखणे अथवा आवश्यकतेनुसार पुर्नविकासाठी क्लस्टर सारखी योजना अंमलात आणणे, शहरात सिडको वसाहतींच्या पुनर्विकासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष तयार करणे, नवी मुंबईतील गावांमध्ये आकारण्यात आलेला वाढीव मालमत्ता कर तातडीने माफ करणे, धोकादायक ठरलेल्या माथाडी वसाहतींच्या पुनर्विकासात येणारे सर्व अडथळे दूर करणे, नवी मुंबई पोलिस वसाहतीत अत्याधुनिक सुविधा निर्माण करणे आणि आवश्यक त्याठिकाणी पुनर्विकासाठी सकारात्मक धोरण आखणे, नवी मुंबईत स्वतंत्र सायकल मार्गिका, जागिंग ट्रॅक, योग उद्यानाची निर्मिती करणे, शहरात फ्लेमिंगो तसेच पक्षी अभयारण्यासाठी ठोस धोरण आखणे आणि पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे तसेच लाडक्या बहिणी सुरक्षा आणि संधी या योजनेअंतर्गत उद्यानांची जबाबदारी महिला बचतगटांकडे, स्मार्ट सीसीटिव्ही नेटवर्क, महिला मोबाईल शौचालये, मनपात महिलांसाठी विशेष सेवा खिडकी, महिला बचतगटांसाठी विशेष बाजारपेठ, कामगार महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर व वर्किंग वुमन हॉस्टेल आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी खा.नरेश म्हस्के यांच्यासह उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर, किशोर पाटकर आदी सर्वांनी नामदार गणेश नाईक यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टिकेचा भडीमार केला.

शिवसेना उपनेते विजय नाहटा म्हणाले की, एखाद्यावर लूट केली असा आरोप करणे सोपे आहे, मात्र ती कोणी केली हे पाहणे गरजेचे आहे. पुनर्विकास सुरु असलेल्या प्रत्येक साईडवर जावून तुमचे चिरंजीव खंडणी घेतात असा आरोप यावेळी उपनेते विजय नाहटा यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्यात येऊ नये यासाठी यांच्याच खासदार मुलाने विरोध करत, त्या पत्रावर सही केली होती. भाजपचे यांना काहीच मान्य नाही, इतका अहंकार त्यांना आहे की त्यांनी पक्षाचे स्टार प्रचारक नाकारले अशी टिकाही त्यांनी ना.गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता केली. जिल्हाप्रमुख किशोर पाटकर म्हणाले की, विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाल्यावर यांनी त्यांच्याशी भांडणे केली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही त्यांच्याशी वाद करत राहिले. आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री आहेत व त्यांच्या माध्यमातून आम्हाला नवी मुंबईचा विकास करायचा आहे. मात्र यांच्या अहंकारी वृत्तीमुळे विविध समस्या निर्माण झाल्याचा आरोप केला. नवी मुंबईचे वाटोळे करण्यामध्ये ह्या फॅमिलीचा नंबर असल्याची टिकाही पाटकर यांनी यावेळी केली. तर जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर यानी टिका करतांना, गत २५ वर्षात तुमच्या ताब्यात सत्ता होती. मग गावठाणांचा विकास का केला नाही. तुम्हाला कुणी अडवले होते असे सांगत प्रकल्पग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सर्वात मोठा निर्णय घेतल्याचे नमूद केले. तुम्ही दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता, हिशोब काढण्याची भाषा करता मग, तुमचा २५ वर्षातील सत्तेतील पाच टक्केचा हिशेब सुध्दा आम्ही काढू शकतो अशी टिकाही केली.

आमची लढाई नाईक जनता पार्टीशी...

यावेळी खा. नरेश म्हस्के यांनी नामदार गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. आमची लढाई मुळ भाजपवाशी भारतीय जनता पार्टी यांच्याविरोधात नाहीतर एनजेपी अर्थात नाईक जनता पार्टी यांच्याशी आहे. ऐरोलीत त्यांनी आपल्या भाषणात, अनवधनाने घडयाळास मदत करण्याचे आवाहन केले. स्वतःच्या फायद्या करिता त्यांनी पक्षषदल करत आपल्या हाती कमळ घेतले आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पास विरोध करणारे हेच ते शिल्पकार होते. नंदी बैलासारखे गुबू गुबू माना हलविणारे लोकप्रतिनिधी त्यांना पाहिजेत म्हणून त्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना तिकीटे दिली असल्याचा आरोपही खा. म्हस्के यांनी यावेळी केला.

जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर भाजपला आवाहन

शिवसेनेच्या या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावरील भागात शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे लहान आकारातील फोटो प्रसिध्द करण्यात आले आहेत, तर त्याखालील बाजुस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो प्रसिध्द करण्यात आला असून त्याच्या बाजुस, काळ्या दगडावरची भगवी रेघ...नवी मुंबई नवं सरकार...अशा स्वरूपाचा शिर्षकाव्दारे एकप्रकारे भाजपला आव्हान देणारा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात हे आवाहन कितपत खरे होते, हे येत्या १६ तारखेला स्पष्ट होईल.


Most Popular News of this Week